फोंडा तालुक्यातील महत्त्वाची मंदिरे भाविकांसाठी खुली

मंगेश मंदिर

फोंडा, ३० सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात कोरोना महामारी नियंत्रणात येत असल्याने फोंडा तालुक्यातील महत्त्वाची मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मंदिरात येणारे भाविक आणि पर्यटक यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे. फोंडा तालुक्यातील महत्त्वाची मंदिरे ही पर्यटनस्थळे आहेत.

मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असणार आहे. हे मंदिर यापूर्वी काही घंटे  भाविकांसाठी खुले होते. मंदिर परिसरात फुलांची विक्री करण्यास अनुमती देण्यात आली आहे; मात्र मंदिरात श्रींचे केवळ मुखदर्शन करता येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

शिरोडा येथील श्री कामाक्षी देवस्थानही भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरात ६ ऑक्टोबर या दिवशी ‘अमावास्ये’च्या दिवशी धार्मिक कार्यक्रमात भाविकांना सहभागी होता येणार आहे. म्हार्दाेळ येथील श्री महालसा मंदिरही आवश्यक निर्बंधासह भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी १२, तर दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे.