शिरसोली (जळगाव) येथे गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने दिलेला कचर्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशभक्‍तांच्‍या प्रखर विरोधानंतर पालटला !

  • हिंदूंंच्‍या धर्मभावनांशी खेळणार्‍या ग्रामपंचायतीच्‍या संबंधित व्‍यक्‍तींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !
  • प्राणप्रतिष्‍ठा केलेल्‍या श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी कचर्‍याचा ट्रॅक्‍टर देण्‍यास  प्रशासन धजावते तरी कसे ? श्री गणेशमूर्ती घरी आणतांना आणि घरी असतांना ‘प्रत्‍यक्ष श्री गणपति घरी आहे’, अशी भाविकांची श्रद्धा असते. असे असतांना त्‍याला कचर्‍याची गाडी विसर्जनासाठी देणारे या हिंदूंच्‍या श्रद्धेवर घालाच घालत आहेत !
  • अन्‍यही असे कुठे होत असेल, तर तेथील गणेशभक्‍तांनी या घटनेतून प्रेरणा घ्‍यावी !
प्रतीकात्मक छायाचित्र

शिरसोली  (जळगाव) – येथे श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी दिलेला कचर्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशभक्‍तांच्‍या प्रखर विरोधानंतर पालटला. (कचरा गोळा करण्‍याचा ट्रॅक्‍टर श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी देऊन प्रशासनाने श्री गणेशाचा अवमानच केला आहे. हा अवमान रोखण्‍याचा प्रयत्न करणार्‍या गणेशभक्‍तांचे अभिनंदन ! – संपादक)

ग्रामपंचायतीने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यासाठी जो ट्रॅक्‍टर उपलब्‍ध करून दिला तो कचर्‍याचा असून केवळ वरवर पाणी मारून दिला असल्‍याचे लक्षात आल्‍यावर गणेशभक्‍तांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला. गणेशभक्‍तांच्‍या तीव्र विरोधानंतर ग्रामपंचायतीकडून सारवासारव करण्‍यात आली आणि दुसरा ट्रॅक्‍टर गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आला. (अन्‍य पंथियांच्‍या संदर्भात ग्रामपंचायतीने असे केले असते का ? – संपादक)

या गावात ७ दिवसांनी श्रींचे विसर्जन करण्‍याची परंपरा आहे. या दिवशी गणेशमूर्तींची संख्‍या अधिक असल्‍याने ग्रामपंचायत सुविधा म्‍हणून ट्रॅक्‍टर उपलब्‍ध करून देत असते. ‘मागील वर्षीही ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा गोळा करण्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी दिला होता’, असे काही गणेशभक्‍तांनी सांगितले.