साम्यवाद्यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या आणि अन्य सहस्रो लोकांच्या केलेल्या निर्घृण हत्यांविषयी स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आवाज का उठवत नाहीत ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदू जनजागृती समिति

‘गौरी लंकेश प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंसक साम्यवाद्यांविषयी मौन आणि हिंदुत्वनिष्ठांवर खोटे आरोप, हा निधर्मीवाद्यांचा ढोंगीपणा ! – संपादक

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

मुंबई – साम्यवादी विचारांच्या नक्षलवाद्यांकडून भारतात आतापर्यंत १४ सहस्र नागरिक, पोलीस, आमदार, मंत्री इत्यादींच्या निर्घृण हत्या करण्यात आलेल्या आहेत. साम्यवाद्यांनी जगभरात १० कोटींहून अधिक लोकांच्या हत्या केल्या आहेत. याविषयी कुणी काहीच बोलत नाही. मैसुरू येथे आबिद पाशा टोळीने ८ हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या. त्याविषयी कुणी बोलत नाही; मात्र ज्या गौरी लंकेशला मृत्यूच्या आधी कुणी ओळखत नव्हते, जिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि हिंदु धर्म यांविषयी अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले आहे; तिचे उदात्तीकरण केले जात आहे. जणू आपल्या देशात गांधींच्या हत्येनंतर केवळ चारच पुरोगाम्यांच्या हत्या झाल्या आहेत, असे दाखवून त्याचे भांडवल केले जात आहे. अन्य हत्यांविषयी पुरोगामी म्हणवणारे आवाज का उठवत नाहीत ? असा प्रश्न हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गौरी लंकेश प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. या चर्चासत्रामध्ये कर्नाटकमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. एस्. भास्करन् सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर यांनी केले.

कर्नाटकमध्ये २५ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झालेल्या असतांना गौरी लंकेश यांचीच हत्या महत्त्वाची का वाटते ? – एस्. भास्करन्, हिंदुत्वनिष्ठ

एस्. भास्करन्

गौरी लंकेश यांच्या आधी भारतात वर्ष २०१३ पासून ते २०१७ पर्यंत २३ पत्रकार आणि ७ माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या हत्या झाल्या; पण त्याविषयी कुणीच का बोलत नाही ? गौरी लंकेश यांच्या हत्येच्या ३ दिवस आधी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना हटवून त्यांच्या जागी अन्य एका गृहमंत्र्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर हिंदूंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. यामागे काही षड्यंत्र तर नाही ना, हे पहायला हवे. कर्नाटकमध्ये २५ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या असतांना तत्कालीन काँग्रेस सरकारला गौरी लंकेश यांचीच हत्या महत्त्वाची का वाटली ?

गौरी लंकेश यांच्या हत्येमागे नक्षलवाद्यांच्या सहभागाचे अन्वेषण करा ! – सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्था

सौ. लक्ष्मी पै

गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनी काही नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास लावल्यामुळे गौरी लंकेश यांना नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांचा भाऊ इंद्रजित लंकेश यांनी त्यांच्या हत्येमागे नक्षलवादी असल्याची शक्यता वर्तवली होती; मात्र त्या अनुषंगाने पोलिसांनी अन्वेषण केले नाही. याचे पोलिसांनी अन्वेषण करायला हवे.