हिंदु महासभा म. गांधी हत्येतील दुसरे दोषी नारायण आपटे यांच्या मूर्तीची स्थापना करणार !

मेरठ (उत्तरप्रदेश) – म. गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांची मूर्ती हिंदु महासभेने बनवली होती. आता याच संघटनेने गांधी यांच्या हत्येतील दुसरे मुख्य दोषी आणि फाशीची शिक्षा झालेले नारायण आपटे यांचीही मूर्ती बनवली आहे. लवकरच या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी मेरठ येथील हिंदु महासभेच्या भवनाला घेराव घातला. नारायण आपटे यांची मूर्ती सध्या कुठे आहे, याविषयी पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही. हिंदु महासभेने यापूर्वीही नथुराम गोडसे यांचे मंदिर आणि ज्ञानशाळा यांची स्थापना केली होती; पण त्यानंतर प्रशासनाने कारवाई केली होती.

१. मध्यप्रदेशातील दौलतागंज या ठिकाणी २ मासांपूर्वी हिंदु महासभेची एक मोठी बैठक पार पडली होती. यात महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी नारायण आपटे यांची मूर्ती सिद्ध असल्याचे म्हटले होते. ‘संधी मिळताच आपटे यांच्या मूर्तीची स्थापना केली जाईल’, असेही त्यांनी बैठकीत म्हटले होते. या बैठकीत त्यांनी नारायण आपटे यांचा उल्लेख ‘हुतात्मा’ असा केला होता. या वेळी महासभेचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

२. ग्वाल्हेर येथे नारायण आपटे यांची २ फूट उंचीची मूर्ती बनवण्याचे काम २ मासांपूर्वी चालू झाले होते. ४५ सहस्र रुपयांत बनवण्यात आलेल्या मूर्तीचे काम १५ दिवसांपूर्वीच पूर्ण झाल्यानंतर ही मूर्ती मेरठ येथील हिंदु महासभेच्या भवनामध्ये स्थापन करण्यासाठी पाठवण्यात आली होती.

नारायण आपटे यांचा म. गांधी यांच्या हत्येतील सहभाग !

३० जानेवारी १९४८ या दिवशी म. गांधी यांच्या हत्येच्या वेळी नारायण आपटे पंडित नथुराम गोडसे यांच्या पाठीमागेच उभे होते. या हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने १० फेब्रुवारी १९४९ या दिवशी पंडित नथुराम गोडसे यांच्यासह आपटे यांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. उर्वरित ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.