राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामधील घटना
या आरोपाची चौकशी करून सत्य समोर येणे आवश्यक ! – संपादक
जयपूर – राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामध्ये एका युवतीने पोलीस निरीक्षक सुभाष कुमार यांनी छेडछाड करत पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक डॉ. हवासिंह घुमरिया यांनी माहिती मागवली असून दोषी आढळल्यास पोलीस निरीक्षकावर कठोेर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘या प्रकरणाचा १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करावा’, असा आदेश मानवाधिकार आयोगाने पोलीस अधीक्षकांना दिला आहे. पोलीस अधीक्षक कुंवर राष्ट्रदीप यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
१. सीकर जिल्ह्यातील एक युवती बेपत्ता झाल्याच्या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांच्या अन्वेषणामध्ये युवती तिच्या प्रियकरासमवेत श्रीगंगानगर येथे असल्याचे समजले. २९ ऑगस्ट या दिवशी सिंगरावट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष कुमार २ पोलिसांसमवेत श्रीगंगानगर येथे गेले.
२. युवतीने, ‘श्रीगंगानगर येथून परत येत असतांना पोलीस वाहनामध्ये सुभाष कुमार यांनी माझ्या प्रियकराला समोरच्या सीटवर बसायला लावले. त्यानंतर स्वत: माझ्याजवळ बसून संपूर्ण प्रवासात माझी छेड काढली, तसेच मी विरोध केल्यावर मला मारहाण केली. रात्री उशिरा पोलीस ठाण्यात पोचल्यावर सुभाष कुमार यांनी प्रियकराला ठाण्याबाहेर पाठवले. त्यानंतर चौकशी करण्याच्या निमित्ताने पोलीस ठाण्यामध्ये माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर आम्हाला घरी पाठवून देण्यात आले’, असा आरोप केला.
३. याविषयी प्रियकराने कुटुंबियांना माहिती दिली. तेव्हा पोलीस ठाण्यात बैठक होऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला. याचे समाधान न झाल्याने युवतीसह प्रियकराने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली. पोलीस अधीक्षक कुंवर राष्ट्रदीप म्हणाले की, प्रियकराला वाचवण्यासाठी युवतीने पोलिसांवर आरोप केले आहेत. महिला पोलीस असतांना छेडछाड आणि पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार होण्याची शक्यता अल्प आहे. तथापि श्रीगंगानगर येथून येतांना मार्गामध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पडताळण्यात येत आहेत.