अमानुष मोगल आक्रमक ‘राष्ट्र निर्माता’; तर मग प्रभु श्रीरामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत हिंदु राजे कोण होते ?

  • हिंदु जनजागृती समितीचा कबीर खान यांना प्रश्न

  • अफगाणिस्तानात राष्ट्रनिर्माणाचे कार्य करण्याचा समितीचा सल्ला

  • ‘द एम्पायर’ वेब सिरीज दाखवणार्‍या ‘डीस्ने-हॉटस्टार’वर बहिष्कार घालण्याचे हिंदूंना आवाहन !

मुंबई – ‘द एम्पायर’ नामक बाबराचे उदात्तीकरण करणारी वेब सिरीज प्रदर्शित होत असतांना चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांना मोगलच खरे ‘राष्ट्र निर्माता’ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ‘मोगल आणि मुसलमान शासक यांना खलनायक दाखवणे, हे चिंताजनक वाटते’, असे ते म्हणाले. ‘आक्रमक मोगल जर ‘राष्ट्र निर्माते’ होते, तर मग भारतभूमीतील प्रभु श्रीरामांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत होऊन गेलेले हिंदु राजे कोण होते ?’ असा प्रश्न उपस्थित होतो. १७ वेळा सोमनाथाचे मंदिर, १८ वेळा जगन्नाथाचे मंदिर कुणी लुटले ? अयोध्या, मथुरा आणि काशी येथील हिंदूंची भव्य मंदिरे कुणी उद्ध्वस्त केली ? शीख गुरूंवर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या कुणी केली ?

३० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये इस्लामी राष्ट्रनिर्माणाचे कार्य करण्यासाठी हिंदु पंडितांवर केलेल्या अत्याचारांनी विस्थापित झालेल्यांपैकी एकही हिंदु पंडित आज काश्मीरमध्ये परतलेला नाही. इतके होऊनही भारतात असुरक्षित आणि भीती वाटत असल्याचा कांगावा करत हतबल होऊन रहाण्यापेक्षा आता संपूर्ण इस्लामी शरीयत लागू असणार्‍या अफगाणिस्तानात जाऊन तेथे त्यांनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य करावे, असा सल्ला हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कबीर खान यांना दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हातात घेतल्यानंतर तेथील जनतेवर होणारे अत्याचार आणि देशातून पलायन करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष समोर येत आहे. मागील सत्ताकाळात तालिबान्यांनी बामियानच्या प्राचीन बुद्धमूर्ती कशा उद्ध्वस्त केल्या, ते सर्वांनी पाहिले. आधुनिक काळात अल्पसंख्य आणि अन्य पंथांची श्रद्धास्थाने यांच्यावर एवढे अत्याचार केले जात असतील, तर ७००-८०० वर्षांपूर्वी भारतावर आक्रमणे केलेल्या मोगल आक्रमकांनी किती अत्याचार केले असतील, याची कल्पनाच न केलेली बरी ! हे सत्य दडपून टाकण्यासाठी भारतातील विशिष्ट गट प्रयत्नरत असतो. भारतीय चित्रपटसृष्टी यात पुढे असते. पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून सैनिकांच्या हत्या केल्याचे दुःख न बाळगता ते पाकिस्तानातील कलाकारांना भारतात आणून त्यांना रोजगार मिळवून देतात. त्यातच आता मोगल आक्रमकांच्या अत्याचारी इतिहासावर पांघरुण घालून तालिबानचे समर्थन करण्याचा हा डाव आहे.

२. आक्रमकांच्या अमानुषतेचे वर्णन त्यांच्या ‘अखबार’ आदी इतिहासग्रंथांत असून त्यात हिंदूंना बळाने मुसलमान बनवण्याचे, मंदिरांचा विध्वंस करण्याचे, महिलांना गुलाम बनवण्याचे दिलेले आदेश उपलब्ध असतांना त्यांना खलनायक दाखवण्याविषयी खेद व्यक्त करण्याचे आश्चर्य वाटते. शीख गुरु, स्वतःचा भाऊ दारा शिकोह, छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेब हा ‘राष्ट्र निर्माता’ होता का ? तालिबानी विचारसरणीला साहाय्य करणार्‍या कबीर खान यांना वैध मार्गाने धडा शिकवण्यासाठी त्यांच्या आगामी सर्व चित्रपटांवर, तसेच अमानुष बाबराचे उदात्तीकरण करणारी ‘द एम्पायर’ वेब सिरीज दाखवणार्‍या ‘डिस्ने-हॉटस्टार’वर हिंदूंनी बहिष्कार घालावा.