रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे. (पू. (सौ.) शैलजा परांजपे या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मातोश्री आहेत.)   

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

             

(भाग १)

पू. (सौ.) शैलजा परांजपे

पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना ७३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘माझ्या जन्मापासून ते संतपदापर्यंत (वर्ष १९४८ ते वर्ष २०२१ या कालावधीत) अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना तोंड देत देवाने करवून घेतलेल्या वाटचालीचे यथामती आणि यथाशक्ती कथन करत आहे.

हे श्रीरामराया, हे परात्पर गुरुदेव डॉ. जयंत आठवले आणि प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज, आपल्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम ! गुरुदेवा, खरंतर स्वतःविषयी लिहिण्यासारखे माझ्यात आहे तरी काय ? मी तुमच्याच आधारावर सर्व जीवन जगले. सगळे काही तुम्हीच केलेत, करवून घेतलेत आणि करतही आहात. तुमच्या आधाराची काठी घेतल्याविना मी एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही. केवळ ‘तुमचे आज्ञापालन करणे’, एवढेच कर्तव्य मानून स्वतःविषयी लिहिण्याचा हा प्रपंच मांडते. ‘तुम्हाला अपेक्षित असे लिहायला बुद्धी आणि बळ द्या’, हीच प्रार्थना !

१. पू. आजींच्या जन्माविषयीची कथा

माझा जन्म श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२५.८.१९४८) या दिवशी ‘जायगव्हाण’ (तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली) या गावी झाला. माझे माहेरचे नाव कु. नलिनी अनंत कानिटकर होते. माझ्या वडिलांचे नाव (कै.) अनंत लक्ष्मण कानिटकर आणि आईचे नाव (कै.) कमळाबाई अनंत कानिटकर होते. माझ्या जन्माचीसुद्धा एक कथा आहे. ‘ती सांगावी’, असे मला वाटते; कारण तिचा संबंध श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्माशी आहे. पूर्वीच्या पद्धतीनुसार माझ्या मोठ्या बहिणीचे ((कै.) इंदिरा गोविंद वाटवे यांचे) लग्न लवकर झाले. त्यामुळे माझ्या आईच्या साहाय्यासाठी घरी कुणीच नव्हते. माझी आई आणि तिच्या मैत्रिणी गावातील पांडुरंगाच्या मंदिरात चातुर्मासात पहाटे काकड आरतीला (देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी मंदिरात केल्या जाणार्‍या आरतीला) आणि संध्याकाळी देवळात सांजवात करण्यासाठी जात असत. विरंगुळा म्हणून त्या देवळात बोलत बसत असत. एकदा बोलतांना ‘माझ्या आईच्या साहाय्याला घरात कुणी नाही’, हा विषय निघाला. आईच्या मैत्रिणींनी देवाला नमस्कार करतांना ‘कमळावहिनींना त्यांच्या साहाय्यासाठी मुलगी होऊ दे’, असा नवस रखुमाईदेवीला केला आणि आश्चर्य म्हणजे रखुमाई खरेच नवसाला पावली ! माझ्या भावाच्या पाठीवर १२ वर्षांनी माझा जन्म झाला. ‘रखुमाईदेवी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपाने माझ्या पोटी जन्म घेणार होती; म्हणून तिने मला जन्माला घातले’, असे मला वाटते. महर्षींनीही सांगितले आहे, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांच्या आजीचा आशीर्वाद आहे.’ त्याची प्रचीती आता येते.

२. कष्टप्रद बालपण

२ अ. माहेरच्या गावात दुष्काळ असणे, पाण्याअभावी पीक न येणे आणि त्यामुळे वडिलांनी भूमी विकून गरिबीत प्रपंच करणे : माझे माहेर सांगली जिल्ह्यातील ‘जायगव्हाण’ या नावाच्या एका मागासलेल्या खेड्यात आहे. त्या वेळी तेथे वीज आणि पाणी नव्हते. आमच्या गावी एस्.टी.चीसुद्धा सोय नव्हती. परगावी जावे लागल्यास ३ मैलांवरील एका गावी चालत जावे लागत असे. माझे वडील शेती करत असत. आमच्या गावाकडील भाग दुष्काळी होता. तेथे पाऊस पडत नसे. त्यामुळे विहिरीला पाणी नसायचे. पाण्याअभावी पिके येत नसत. त्यामुळे माझ्या वडिलांनी भूमी विकून गरिबीत प्रपंच केला.

२ आ. मोहनदास गांधी यांची हत्या झाल्यावर एका संतप्त जमावाने निष्पाप ब्राह्मण कुटुंबांची घरे पेटवणे, त्यांत वडिलांच्या घराचाही समावेश असणे, आई-वडिलांना नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागणे आणि त्यानंतर शासनाकडून साहाय्य मिळाल्यावर त्यांनी छोटे घर बांधणे : माझ्या जन्माच्या ५ मास आधी मोहनदास गांधी यांची हत्या झाली. ती हत्या नथुराम गोडसे या ब्राह्मण व्यक्तीने केली; म्हणून एका संतप्त जमावाने आमच्या गावातील ब्राह्मणांचे ९ वाडे आमच्याच घरातील रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यांनी आमचा वाडाही पेटवला. माझे आई-वडील नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले. त्या वेळी सर्व ब्राह्मण कुटुंबांनी तेथे असलेल्या गणपति मंदिरात आसरा घेतला. गावातील लोकांनी आमच्या घरातील भांडी-कुंडी, धन-धान्य, कपडे-लत्ते लुटून नेले आणि सगळ्यांना कंगाल केले. त्यानंतर शासनाकडून थोडे आर्थिक साहाय्य मिळाले. त्यामुळे सगळ्यांनी छोटी घरे बांधली. नातेवाइकांनीही थोडे साहाय्य केले.

२ इ. गरीब परिस्थिती असल्याने आईच्या सांगण्याप्रमाणे घरचे आंबे विकायला बसावे लागणे : माझे बालपण अत्यंत गरिबीत गेले. आमच्या शेतात आंब्यांची झाडे होती. मी लहान असतांना आंब्यांच्या दिवसांत त्या आंब्यांचे चार पैसे मिळावेत; म्हणून माझी आई मला टोपलीत आंबे घेऊन दारात ते विकायला बसवत असे. त्या वेळी ‘आहे त्या परिस्थितीत आनंदी कसे रहायचे ?’, हेच देवाने मला शिकवले. देवाने यांतूनही आम्हाला बाहेर काढले. त्याने मला जशी गरिबी दाखवली, तशी सासरी गेल्यावर श्रीमंतीही दाखवली.

२ ई. शिक्षण : जायगव्हाण या गावी चौथीपर्यंतच शिक्षणाची सोय होती. माझे चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील माधवनगर या गावी एक खोली भाड्याने घेतली आणि तेथे रहायला गेलो. माझे शिक्षण अकरावीपर्यंत (पूर्वीच्या मॅट्रिकपर्यंत) झाले. वडिलांनी मला महाविद्यालयात पाठवले नाही. मुलींनी अधिक शिकलेले त्यांना आवडत नसे. आमचे त्यांच्या पुढे बोलण्याचे धाडस नव्हते. मी घरी राहूनच शिवणकाम, विणकाम आणि भरतकाम शिकले.

२ ए. गरिबीमुळे आणि गावी शिक्षणाची सोय नसल्यामुळे वडिलांनी भावांना सांगलीला नातेवाइकांकडे शिकायला ठेवणे, त्यामुळे त्यांचे जीवन आश्रिताप्रमाणे असणे; पण त्याही स्थितीत ते आनंदी असणे : मला मोठे तीन भाऊ ((कै.) दत्तात्रय अनंत कानिटकर, (कै.) यशवंत अनंत कानिटकर आणि (कै.) जनार्दन अनंत कानिटकर) आणि एक बहीण ((कै.) इंदिरा गोविंद वाटवे) होती. भावंडांमध्ये मी सर्वांत लहान होते. गरिबीमुळे आणि गावी शिक्षणाची सोय नसल्यामुळे वडिलांनी माझ्या भावांना सांगलीला नातेवाइकांकडे शिकायला ठेवले होते. त्यामुळे त्यांचे जीवन आश्रिताप्रमाणेच होते. त्यांना माधुकरी (५ ब्राह्मणांच्या घरी मागितलेली भिक्षा) मागावी लागत असे. माझा मोठा भाऊ रस्त्यावर उभा राहून फुगे फुगवून विकत असे आणि शाळेचे शुल्क (फी) देत असे. माझे भाऊ नातेवाइकांच्या घरी रहात असल्यामुळे त्यांना सतत मन मारून रहावे लागे. त्यांची कुठलीही हौस होत नसे. आई-वडिलांचे संस्कारच असे होते की, भावंडांनी त्याविषयी कधीही तक्रार केली नाही. ते सतत आनंदी असायचे.

३. आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये

३ अ. आईची गुणवैशिष्ट्ये

३ अ १. कष्टाळू आणि प्रेमळ : माझी आई अत्यंत कष्टाळू, शिस्तप्रिय, प्रेमळ; देवाने जे दिले आहे, त्यात आनंद मानणारी, दानधर्म करणारी, आल्या-गेल्याचे आनंदाने स्वागत करणारी, अशी होती.

३ अ २. शिकण्याची वृत्ती : आईचे शिक्षण झाले नव्हते. ती शेजारच्या मुलीकडून मुळाक्षरे शिकली आणि दासबोध, ज्ञानेश्वरी अन् भागवत, यांसारखे ग्रंथ वाचू लागली.

३ आ. वडिलांची गुणवैशिष्ट्ये

३ आ १. वडील अत्यंत शिस्तप्रिय, लोकांच्या साहाय्याला धावून जाणारे, आहे त्यात आनंद मानणारे आणि कष्टाळू होते.

३ आ २. धर्मकार्यात सहभागी होणे : माझ्या वडिलांनी आमच्या शेतात एक धर्मशाळा बांधली होती. पंढरपूरच्या वारीला जातांना वारकरी त्या धर्मशाळेत मुक्काम करत असत; कारण आमच्या गावातूनच दिंडी जात असे. वडील वारकर्‍यांना चहा देत असत.

३ आ ३. वडील लहान मुलांचे वैद्य असणे आणि गरिबी असूनही त्यांनी लहान मुलांकडून औषधाचे पैसे न घेणे : गरिबीमुळे वडिलांना नेसायला चांगले धोतरही नसायचे. त्यांचे प्रत्येक धोतर फाटलेले होते. त्यांचे धोतर जेथे फाटलेले असायचे, तेथे गाठी मारलेल्या असत. ते ‘मोडी’ भाषेतून चौथीपर्यंत शिकले होते. ते लहान मुलांचे वैद्य होते. ते लहान मुलांना फुकट औषधे देत असत. त्यांना नाडीपरीक्षा चांगल्या प्रकारे करता येत होती. स्वतः फाटकी धोतरे नेसत असले, तरी लहान मुलांकडून त्यांनी औषधाचे पैसे घेतले नाहीत. केवढा हा त्यांच्या मनाचा मोठेपणा !

४. आई-वडिलांनी केलेले संस्कार

माझे बालपण मी ११ वर्षांची होईपर्यंत जायगव्हाण या गावीच गेले. तिथेच मला आई-वडिलांनी संस्कारांचे बाळकडू पाजले. त्यांनी संस्कार आणि धर्माचरण यांतून मला ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे शिकवले आणि माझ्याकडून प्रत्यक्ष कृतीही करवून घेतली.

४ अ. मुलांवर धार्मिकतेचे संस्कार करणे : माझे आई-वडील अत्यंत भाविक होते. त्यांनी आम्हा भावंडांवर तेच संस्कार केले. त्यांनी ऋण काढून सण (देवधर्म) केले; पण ते कधीही देवाचे करायला चुकले नाहीत.

४ आ. वडिलांनी चूक झाल्यावर मुलांना शिक्षा करणे : वडिलांना गैरवर्तन खपत नसे. एकदा माझ्याकडे पाटीवरची पेन्सिल नव्हती. ती आणायला वडील पैसे देत नव्हते; म्हणून मी हळूच त्यांच्याकडचा एक आणा (पूर्वीचे नाणे – रुपयाचा सोळावा भाग) चोरला. त्यांना हे कळल्यावर त्यांनी मला इतके मारले की, त्यांच्या हातातील काठी तुटली. त्या वेळी आईनेही मला साहाय्य केले नाही. ‘एकदाच अशी शिक्षा करायची की, ती जन्मभर लक्षात राहील’, असे त्यांचे वागणे असायचे.

४ इ. आईच्या समवेत सर्व कामे केल्याने लहानपणापासून कष्टाची सवय लागणे आणि कामे करतांना आईचा नामजप चालू असणे : आमच्या घरी गायी आणि म्हशी होत्या. ‘त्यांचे शेण काढणे, दूध काढणे, शेणी (गोवर्‍या) लावणे, विहिरीचे पाणी काढणे, ओढ्यावर कपडे धुवायला जाणे, भूमी सारवणे, लाकडे तोडणे, जात्यावर दळण दळणे’, अशी कामे मला आईच्या समवेत करावी लागत. त्यामुळे मला लहानपणापासून कष्टाची सवय लागली. ही कामे करतांना आईचा नामजप चालू असायचा.

४ ई. आईने केलेले धर्माचरणाचे संस्कार : खरोखर आईनेच मला संस्कारित केले. प्रत्येक कृतीतून तिने मला धर्माचरण शिकवले. त्याविषयी पुढे दिले आहे.

४ ई १. सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर : ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती…’, हा श्लोक म्हणणे, घरी केलेल्या राखुंडीने (दंतमंजनाने) दात घासणे, नंतर देवाला प्रार्थना करून ‘वक्रतुण्ड महाकाय..’ हा श्लोक म्हणणे, आई-वडिलांना नमस्कार करणे इत्यादी.

४ ई २. स्नान करतांना : आई बालदीतील पाण्याला ‘गंगे, गोदे, यमुने, गोदावरी आणि सरस्वती या पाच नद्यांनो, तुम्ही मला स्नान घाला’, अशी प्रार्थना करायची. ‘स्नान करतांना अंगावर एक तरी कपडा ठेवूनच स्नान करायला हवे’, असे ती सांगायची; कारण खरे तसेच शास्त्र आहे. हे शास्त्र आता कोण पाळते ? पण त्या वेळच्या स्त्रियांना हे ज्ञात होते. मला डोक्यावरून न्हायला घालतांना आई पाट मांडून त्याच्या भोवती रांगोळी काढायची. नंतर त्या पाटावर मला बसवून तेल लावायची. तेल लावतांना आधी तेलाच्या वाटीत पाच बोटे बुडवून ती ते भूमीवर टेकवायची; म्हणजे आधी भूमीला तेल लावायची.

४ ई ३. स्नान झाल्यावर : ती प्रथम तुळशीला पाणी घालायची आणि तिची पूजा करतांना पुढील श्लोक म्हणायची.

तुळशी, तुळशी, तू माझी काशी ।
वृंदावनी एकादशी, तिळा-तांदळांच्या राशी ।
तुझी ठेव माझ्यापाशी, शेवंतीचे फूल तोडते ।
रखुमाईची पूजा करते, विठ्ठलाला हार घालते ।।

अजूनही प्रतिदिन तुळशीची पूजा करतांना माझ्याकडून हा श्लोक म्हटला जातो. आई संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायची.

४ ई ४. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करतांना : त्या वेळी चुलीवर स्वयंपाक असायचा. आई आदल्या दिवशी रात्री चूल सारवून तिच्यावर रांगोळी काढून ठेवायची. सकाळी चूल पेटवतांना ती प्रथम अग्नीत तांदुळाचे चार दाणे अर्पण करून नमस्कार करायची आणि मग भात शिजत ठेवायची. असे केल्याने अग्नीत आहुती दिली जाते. ती कायम सोवळे नेसूनच स्वयंपाक करायची. देवाला नैवेद्य दाखवल्याविना घरी कुणीही जेवत नसे.

४ ई ५. पूजेची सिद्धता आणि स्तोत्रपठण : आई मला लहानपणी देवांची उपकरणे (देवपूजेसाठी लागणारी भांडी) घासून पूजेची सिद्धता करून ठेवायला सांगायची. ती मला म्हणायची, ‘‘पूजेची सिद्धता छान कर, म्हणजे नवरा चांगला मिळेल.’’ याचा अर्थ मला असा वाटतो की, त्या वेळी पती हाच स्त्रियांचा परमेश्वर असायचा. ती आम्हाला संध्याकाळी देवाजवळ बसून रामरक्षा, मारुति स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, अथर्वशीर्ष इत्यादी स्तोत्रे म्हणायला सांगायची.

४ ई ६. अन्य संस्कार : आई मला म्हणायची, ‘‘मुलींनी कधीही केस मोकळे सोडू नयेत. तिन्हीसांजेला घराबाहेर पडू नये. उभे राहून वेणी घालू नये. हातांत नेहमी बांगड्या घालाव्यात. वयाच्या ८ व्या वर्षापर्यंत झगा (फ्रॉक) आणि १२ व्या वर्षापर्यंत परकर-पोलके घालावे अन् त्यानंतर साडी नेसावी.’’

४ उ. आईने दिवसभर श्रीरामाचा नामजप करणे आणि मुलांकडूनही नामजप करवून घेणे : माझ्या आईला देवाधर्माची आवड होती. तिने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह घेतला होता. ती दिवसभर ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप अखंड करायची. ती मलाही तिच्या समवेत नामस्मरणाला बसवायची. नामस्मरण झाले, तरच आम्हाला जेवण मिळायचे. त्यामुळे माझ्यात साधनेची आवड निर्माण झाली.

५. आईच्या अंगात महालक्ष्मीचा संचार होणे, त्या वेळी तिच्या निर्‍यांतून कुंकू निघणे, तिच्या नातीचा (सौ. अंजलीचा) विवाह ठरल्यावर महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आईच्या अंगात देवीचा संचार होणे

आईच्या अंगात महालक्ष्मीचा संचार होत असे. संचार झाल्यावर तिच्या साडीच्या निर्‍यांतून कुंकू निघत असे. नवरात्रात अष्टमीला ती महालक्ष्मीसमोर रात्रभर घागर फुंकत असे. त्या वेळी घागरीतून कुंकू निघत असे. ज्या वेळी सौ. अंजलीताईचा (आताच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा) विवाह ठरला, त्या वेळी आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीची पूजा केली होती. तेव्हा आईच्या अंगात देवीचा संचार झाला आणि तिने सौ. अंजलीला प्रसाद म्हणून निर्‍यांतून कुंकू काढून दिले.’

(क्रमशः)

– (पू.) सौ. शैलजा परांजपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२१)

साधिकेला सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे (वय ७८ वर्षे) आणि पू. (सौै.) शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे) यांच्या संदर्भात आलेली अनुभूती

पू. सदाशिव आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

पू. सदाशिव परांजपे (वय ७८ वर्षे) आणि पू. (सौै.) शैलजा परांजपे यांच्या संदर्भात रामनाथी आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

साधिकेला पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौै.) शैलजा परांजपे यांच्यात शिव-पार्वतीचे दर्शन  होणे अन् ‘मागच्या जन्मी परांजपे दांपत्य शिवाची आराधना करत होते’, असे महर्षींनी सांगितले आहे’, असे पू. (सौै.) परांजपे यांनी सांगणे : ‘१८.१०.२०२० या दिवशी पू. सदाशिव परांजपेकाका आणि पू. (सौै.) शैलजा परांजपेकाकू यांच्यामध्ये मला शिव-पार्वतीचे दर्शन झाले. हे मी २०.१०.२०२० या दिवशी पू. परांजपेकाकूंना सांगितले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘माझे नाव ‘शैलजा’ म्हणजे ‘पार्वती’ आहे आणि काकांचे नाव ‘सदाशिव’ म्हणजे ‘शिव’ आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ कैलास पर्वतावर जाऊन आलेल्या आहेत. महर्षींनी सांगितले आहे की, मागच्या जन्मी आम्ही शिवाची आराधना करत होतो.’’

सौ. वैशाली मुद्गल

पू. परांजपेकाकू पुढे म्हणाल्या, ‘‘तुझा भाव चांगला आहे; म्हणून देवाने तुला सूक्ष्म रूपाने हे दाखवले. तुला सूक्ष्मातील कळते का ?’’ हे ऐकून माझा भाव जागृत झाला.

‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘एवढ्या त्रासातही तुम्ही मला भावस्थितीत ठेवत आहात आणि उच्च कोटीची अनुभूती देत आहात’, याबद्दल तुमच्या कोमल चरणी कृतज्ञता !’

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२०)

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग २ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/506437.html