श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे. (पू. (सौ.) शैलजा परांजपे या श्रीचित्शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मातोश्री आहेत.) २७ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांचे कष्टप्रद बालपण, पू. आजींच्या आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये हा भाग पाहिला. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
(भाग २)
भाग १ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/506268.html
६. वैवाहिक जीवन
६ अ. सासरची माणसे चांगली असणे, तेथे धर्माचरणाचे पालन होणे आणि माहेरी सर्व करायची सवय असल्याने सासरी सोपे जाणे : ‘माझा विवाह वयाच्या १९ व्या वर्षी श्री. सदाशिव नारायण परांजपे (आताचे पू. सदाशिव परांजपे) यांच्याशी झाला. माझ्या सासरी सासू-सासरे ((कै.) आनंदीबाई नारायण परांजपे आणि (कै.) नारायण पांडुरंग परांजपे), दीर-जाऊ ((कै.) विठ्ठल नारायण परांजपे आणि (कै.) सुशीला विठ्ठल परांजपे)), त्यांची तीन मुले ((कै.) मुकुंद विठ्ठल परांजपे, सौ. लता अनिल पेंढारकर आणि श्री. मोहन विठ्ठल परांजपे) आणि आम्ही दोघे, असे भाड्याच्या घरात एकत्र रहात होतो. यजमानांना तीन बहिणी ((कै.) निर्मला मनोहर चिपळूणकर, (कै.) शरयू माधव सहस्रबुद्धे आणि (कै.) सुलभा गजानन पाटणकर) आणि एक भाऊ ((कै.) विठ्ठल नारायण परांजपे) होता. माझ्या यजमानांचे थंड पेयांच्या विक्रीचे दुकान होते. माझ्या सासरची माणसेसुद्धा चांगली होती. माझे सासूबाई आणि सासरे शिस्तप्रिय होते. घरी वेळेचे पालन काटेकोरपणे केले जात असे. धर्माचरणाचे पालन होत असे. सासरचे लोक देवधर्म, श्राद्ध-पक्ष व्यवस्थित करत असत. मला माहेरी सर्व करायची सवय असल्यामुळे सासरी जड गेले नाही.
६ आ. अपत्ये : परमेश्वराच्या कृपेने मला तीन मुली (अंजली (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ), कल्पना (आताच्या सौ. कल्पना मनोज सहस्रबुद्धे) आणि सुवर्णा (आताच्या सौ. शीतल अभय गोगटे)) झाल्या. तिन्ही मुली झाल्या; म्हणून नातेवाईक आम्हाला हिणवत असत.
६ इ. परिस्थिती बेताचीच असल्याने घरबसल्या व्यवसाय करून संसाराला हातभार लावणे आणि यजमान दुकानात जात असल्याने घरचे सर्व दायित्व सांभाळणे : पूर्वी आमचे दुकान फार चालत नसे. त्यामुळे आमची परिस्थिती बेताचीच होती. मला सगळीच सवय असल्यामुळे काही नडले नाही. मी मुलींचे आणि यजमानांचे कपडे घरी शिवत असे. मी घरबसल्या ‘लोकांचे कपडे शिवून देणे, लोकरीचे स्वेटर विणून देणे, लोकरीच्या शोभेच्या वस्तू, उदा. गणपति, दारावर लावायची तोरणे, देवाखाली घालायची वस्त्रे इत्यादी करून देणे’, असा व्यवसाय करत असे. तेवढाच संसाराला हातभार ! यजमान सकाळी ११ वाजता दुकानात गेले की, रात्री ११ वाजताच घरी यायचे. त्यामुळे घरचे सर्व दायित्व माझ्यावर असे. मला दुपारी ४ वाजता दुकानातही जावे लागायचे. देवाच्या कृपेने मी सायकलपासून चारचाकी वाहनापर्यंत सर्व वाहने शिकले. त्याचा लाभ मला वरील सर्व गोष्टी करण्यासाठी होत असे.
६ ई. मोठ्या मुलीच्या (अंजलीच्या) जन्मानंतर आर्थिक परिस्थिती सुधारणे : मोठी मुलगी अंजली हिच्या जन्मानंतर आमचे दुकान चांगले चालायला लागले. घरात पैसा येऊ लागला. त्यामुळे देवाच्या कृपेमुळे बंगला, गाडी इत्यादी सर्व मिळाले. घरात फुला-फळांची मोठी बाग झाली. आता ‘चित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ देवीच्या अवतार आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे. त्यामुळे ‘त्यांच्या जन्मानंतर आमची आर्थिक स्थिती सुधारली’, असे मला जाणवले.
७. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना
मी लहानपणापासून देवाच्या सगुण भक्तीत अधिक रमते. मला कीर्तन आणि प्रवचन ऐकण्याची आवड आहे. देवाच्या कृपेने माझ्या काशी, हरिद्वार, रामेश्वर, वैष्णोदेवी, अशा अनेक तीर्थक्षेत्रांच्या यात्रा झाल्या आहेत. आम्ही सांगलीजवळील पंढरपूर या तीर्थक्षेत्री, तसेच नरसोबाच्या वाडीलाही प्रतिमास जात होतो.
८. साधनारत असलेले पू. आजींचे कुटुंबीय !
काळाच्या ओघात मुली मोठ्या होऊन त्यांची शिक्षणे आणि विवाहही झाले. लग्नानंतर मुलींना चांगली घरे मिळाली. ही सगळी देवाची कृपा ! मोठी मुलगी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि जावई सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ, हे दोघे सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतात. त्यांची मुलगी सौ. सायली करंदीकर आणि जावई श्री. सिद्धेश करंदीकर, हे दोघेही पूर्णवेळ साधना करतात. दुसरी मुलगी सौ. कल्पना मनोज सहस्त्रबुद्धे रामनाथी आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करते आणि जावई श्री. मनोज मुकुंद सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) सनातनच्या रामनाथी आश्रमात संगीताच्या संदर्भातील संशोधनाची सेवा करतात. त्यांना दोन मुले (श्री. आशिष मनोज सहस्रबुद्धे आणि श्री. अनिकेत मनोज सहस्रबुद्धे) आहेत. त्यांतील एक मुलगा (श्री. आशिष) अभियंता (इंजिनीयर) आहे आणि दुसरा मुलगा (श्री. अनिकेत) शिकत आहे. तेही घरी राहून सेवा करतात आणि वेळ मिळेल, तेव्हा आश्रमात सेवेला जातात. तिसरी मुलगी सौ. शीतल अभय गोगटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि जावई श्री. अभय दिलीप गोगटे, हे दोघे मिरज येथे रहातात. त्यांना एक मुलगी (कु. निधी अभय गोगटे) आहे. ती शिकत आहे. शीतल घरी राहून सेवा करते.
देवाने सर्वकाही करवून घेतले. मला माझ्या आईने साधना आणि धर्माचरण शिकवल्यामुळे मुलींना चांगले वळण लावता आले आणि ‘मुलींनीही सांगितल्याप्रमाणे ऐकले’, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे देवाने त्यांचे कल्याण केले.
९. मोठी मुलगी आणि जावई यांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ करणे अन् त्यांनी गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी रहायला जाणे
सनातन संस्थेत आल्यावर मला खरी साधना कळली. सौ. अंजली हिचा विवाह झाल्यावर ७ वर्षांनी (वर्ष १९९९ पासून) ती सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागली. तिच्या सासूबाई आणि सासरे (सौ. माधुरी माधव गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि श्री. माधवराव परमानंद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)) हे मुलुंडला परात्पर गुरुदेवांच्या सत्संगाला जात असत आणि तेथे सेवा करत असत. त्यांच्यामुळे अंजलीला साधनेचे महत्त्व समजले. तिच्यात जन्मापासूनच साधनेचे बीज होतेच; पण सासरी गेल्यावर त्याला अंकुर फुटला. जावई सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे पीएच्.डी. (डॉक्टर ऑफ फिलोसॉफी) आहेत. अंजली एम्.एस्.सी. (मास्टर ऑफ सायन्स) आहे. जावई नोकरीनिमित्त बोईसरला होते. त्या वेळी अंजली ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे जीवशास्त्राचे वर्ग घेत असे. वर्ष २००० मध्ये बोईसरला सनातनचा सत्संग ऐकल्यावर जावयांनी नोकरी सोडून साधना करण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघेही गोव्याला आले. त्या वेळी सायली (नात) लहान होती. तिला घेऊन ते गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ सेवा आणि साधना करण्यासाठी गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहायला गेले.
१०. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ आणि केलेल्या सेवा
१० अ. मुलीने पूर्णवेळ साधना करणार असल्याचे सांगितल्यावर तिला पुष्कळ विरोध करणे; परंतु तिने साधनेचे महत्त्व सांगितल्यावर मतपरिवर्तन होणे अन् त्यानंतर घरी राहून साधना करू लागणे : अंजलीने आम्हाला पूर्णवेळ साधना करणार हे सांगितल्यावर आम्ही तिला पुष्कळ विरोध केला; कारण आम्हाला साधना, सेवा इत्यादी काहीच कळत नव्हते. आम्हाला ‘प्रपंच व्यवस्थित करून आणि व्यवसाय करून साधना करायची’, हेच ठाऊक होते. ‘त्यासाठी घर सोडायला लागत नाही’, असे आमचे मत होते. अंजलीने आम्हाला पुष्कळ चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. आम्हालाही ते पटू लागले. ती आमचा अध्यात्मातला पहिला गुरुच आहे. तिने आमचे मतपरिवर्तन केले आणि वर्ष २००१ पासून आम्हीही घरी राहून साधना करू लागलो.
१० आ. मुलीने समष्टी साधनेचे महत्त्व सांगितल्यावर समष्टी साधना करण्याकडील कल वाढणे, मिरज आश्रमात परात्पर गुरुदेवांच्या सत्संगांना जाण्याची संधी मिळणे आणि त्यानंतर अर्पण गोळा करण्याची सेवा करू लागणे : अंजली आणि जावई गोव्याला आश्रमात आल्यावर अंजली वरचेवर दूरभाष करून आमचा सत्संग घ्यायची. ती आम्हाला ‘व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना कशी श्रेष्ठ आहे ?’, याची माहिती द्यायची. त्यामुळे माझा व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना करण्याकडील कल वाढला. मिरज आश्रमात माझे वरचेवर जाणे होऊ लागले. माझा तेथील साधकांशी परिचय वाढू लागला. परात्पर गुरुदेव मिरज आश्रमात जवळजवळ ६ मास होते. त्या वेळी तेथे त्यांचे सत्संग होत असत. मला त्या सत्संगांना जाण्याची संधी मिळाली. मला साधकांच्या समवेत गुरुपौर्णिमेसाठी अर्पण गोळा करण्यासाठी जाता येऊ लागले. त्या वेळी मला ‘साधक समाजात प्रसार कसा करतात ? साधनेचे आणि अर्पणाचे महत्त्व कसे समजावून सांगतात ?’, हे जवळून शिकायला मिळाले. त्यामुळे मीसुद्धा अर्पण गोळा करण्याची सेवा करू लागले. समाजातून चांगला प्रतिसाद मिळू लागला. मी सनातनची सात्त्विक उत्पादने घरी विक्रीसाठी ठेवू लागले.
१० इ. परात्पर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे संगणकावर टंकलेखन आणि नंतर संकलन शिकणे : अंजलीमुळे माझे गोव्यातील आश्रमात वरचेवर जाणे होऊ लागले. तेथे गेल्यावर मी स्वयंपाकघर आणि प्रसाद भांडार येथे सेवा करत असे, तसेच सत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा यांना उपस्थित रहात असे. एकदा माझी परात्पर गुरुदेवांशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही काय सेवा करता ?’’ मी त्यांना माझ्या सेवेविषयी सांगितले. त्यानंतर एकदा गुरुदेवांनी साधकांना सांगितले, ‘‘परांजपेआजींना आता स्वयंपाकघरात सेवा देऊ नका. त्यांनी आयुष्यभर तेच केले आहे. त्यांना संगणक इत्यादी नवीन काहीतरी शिकवा.’’ गुरुदेवांची केवढी ही शिष्याला नवीन नवीन शिकवण्याची तळमळ ! गुरुदेवांना असे वाटले नाही, ‘यांना काय संगणक येणार ? या केव्हा शिकणार आणि काय करणार ?’; पण देवच तो ! त्याचा संकल्प झाला की, काय अशक्य आहे ? त्यांचे बोलणे ऐकल्यावर मी घाबरले आणि माझे हात-पाय कापायलाच लागले; कारण मी आयुष्यात संगणक बघितलासुद्धा नव्हता. दुसर्या दिवशी मी ग्रंथ विभागात गेले. मी हळूहळू एका साधिकेकडून संगणक शिकू लागले. मला एका ओळीचे टंकलेखन करायला एक घंटा लागायचा. पुढे पुढे मी टंकलेखन करू लागले. नंतर गुरुदेवांनी साधकांना सांगितले, ‘‘यांना आता संकलन शिकवा.’’ नंतर मी सांगलीत घरी राहून संकलनाचे धडे गिरवू लागले. पूर्वी मला सगुण भक्ती आवडत होती; पण समष्टी सेवेचे महत्त्व कळल्यावर मी संगणकाच्या सेवेत रमू लागले.
११. साधनेला आरंभ केल्यावर स्वतःत जाणवलेले पालट
अ. मुलींचे विवाह झाल्यानंतर आमचे संसाराचे दायित्व संपले. त्यामुळे घरी राहून माझी समष्टी सेवा चांगली होऊ लागली. मला सेवेचा ध्यास लागला.
आ. माझ्या मनातील मायेचे विचार न्यून झाले.
इ. नातलगांकडे जाण्यात मला रस राहिला नाही; पण साधक घरी आल्यावर मला आनंद व्हायचा आणि ‘आपले कुणीतरी आले’, असे मला वाटायचे. ‘साधकांच्या रूपात परात्पर गुरुदेवच घरी येतात’, असा माझा भाव असायचा. अंजलीमुळे आमच्या घरी बरेच संत येऊन गेले.
१२. वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे आणि वर्ष २०१९ मध्ये संतपदी विराजमान होणे
व्यष्टी आणि समष्टी सेवा करत करत गुरुदेवांनी आमची आध्यात्मिक प्रगती करवून घेतली. वर्ष २०१३ मध्ये माझी आणि माझ्या यजमानांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. ‘आमची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के व्हावी’, अशी आमची अपेक्षा कधीही नव्हती. आम्ही केवळ ‘गुरुदेवांचे आज्ञापालन करायचे आणि झोकून देऊन सेवा करायची’, एवढे एकच ध्येय ठेवले होते. ‘त्याचे फळ देवाने दिले आणि १३.५.२०१९ या दिवशी आम्हा उभयतांना संतपदापर्यंत पोचवले’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.
१३. आपत्काळाची सिद्धता म्हणून वर्ष २०२१ मध्ये आम्ही आमचे सांगलीतील घर विकून गोव्याला रहायला आलो.
१४. पू. आजींनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !
गुरुदेवा, ‘आपण मला या जगतात आणले. अनेक चांगले आणि वाईट प्रसंग दाखवले. त्याला धैर्याने तोेंंड द्यायला शिकवले. मुख्य म्हणजे आम्हाला ‘मनुष्यजन्म कीडा-मुंगीसारखा व्यर्थ न घालवता तो सार्थकी कसा लावू शकतो ?’, याचे ज्ञान दिले. व्यष्टी आणि समष्टी साधना शिकवली. ‘आपण नसता, तर मी काय केले असते ?’, याचा विचारच करवत नाही. माझे अनंत जन्मांचे भाग्य आहे की, मला आपल्यासारखे गुरु भेटले.
‘गुरुदेवा, आपत्काळ कितीही भयानक असू दे. तुमच्या छत्रछायेखाली मला कशाचीही भीती नाही. मला ‘सद्गुरु समर्थ माझा गं, आपत्काळी रक्षणकर्ता गं ।’, असे म्हणावेसे वाटते. गुरुदेवा, आम्हा साधकांना आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करता येऊ दे. परमेश्वरा, मला सतत तुझाच ध्यास असू दे.
‘गुरुराया, माझ्या लिखाणात काही चुका झाल्या असतील, तर या लेकराला सांभाळून घ्या. पुन्हा एकदा आपल्या चरणी कोटी कोटी नमस्कार !’
(‘या लेखातील ‘अंजली’ असा उल्लेख ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ यांच्या संदर्भात केला आहे.’ – संकलक)
(समाप्त)
– पू. (सौ.) शैलजा परांजपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२१)