संभाजीनगर – ‘कोरोनाच्या काळात औषधांसाठी चीनवरचे अवलंबित्व अल्प करण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने महाराष्ट्रात १ सहस्र कोटी रुपयांच्या निधीतून ‘महाऔषधी पार्क’ (‘बल्क ड्रग पार्क’) उभे करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत’, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे नुकतीच दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी यांच्यामध्ये ‘महाऔषधी पार्क’विषयी संवाद चालू झाला आहे. अद्याप या प्रकल्पाचे स्थान ठरलेले नाही.
२. राज्यात विशेष आर्थिक क्षेत्रातील विविध कारणाने अडकून पडलेल्या १ सहस्र ६०० हेक्टर भूमीचा प्रश्न सोडवण्यात आला आहे.
३. राज्यात असे ११० विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण झाले होते. त्या योजनेत सहस्रों हेक्टर भूमी उद्योगाविना पडून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘एकात्मिक औद्योगिक क्षेत्र’ हे नवे धोरण हाती घेण्यात आले. त्यात ज्यांना भूमी परत करणे आवश्यक होते, अशा शेतकर्यांना भूमी परत केल्यानंतर अडकलेला गुंता आता सुटला आहे.
४. संभाजीनगर येथील ‘इन्स्परा’ उद्योग समुहासाठी देण्यात आलेली १०० हेक्टर, तर पुणे जिल्ह्यातील खेड औद्योगिक वसाहतीमधील ‘भारत फोर्ज’कडील १ सहस्र ५०० हेक्टर भूमीचा वाद सुटला आहे.