गजानन काळे यांच्या पत्नीचा आरोप
नवी मुंबई – मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याविरुद्ध केलेली छळवणुकीची तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे; मात्र तीन दिवस उलटूनही काळे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे संजीवनी काळे यांनी सांगितले.
‘एबी’ नावाच्या बोगस आस्थापनाच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. या अनैतिक व्यवहारांना विरोध असल्याने गजानन काळे दमबाजी करत आहेत. या प्रकरणी मनसेच्या नेत्यांनी साधी नोंदही घेतली नाही. पोलीसही मध्यस्थी करून प्रकरण मिटवून टाकण्यासाठी दबाव टाकत आहेत’, असा आरोप संजीवनी काळे यांनी केला आहे. ४ दिवसांपासून गजानन काळे यांना अटक केली जात नसल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करत संजीवनी काळे यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.