सांगली, १५ ऑगस्ट – कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटांपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ञांचा अंदाज असल्याने प्रशासनाने आवश्यक ती सर्व सिद्धता ठेवावी, असे निर्देश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना सद्यःस्थिती आणि संभाव्य तिसर्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाची सिद्धता अन् प्रमुख अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘तिसर्या लाटेत १५० पट रुग्णसंख्या वाढेल, असे तज्ञांचे मत असून ऑक्सिजन साठवण क्षमता आणि निर्मिती यांविषयी योग्य ते नियोजन करावे. लक्षणे दिसू लागताच पडताळणी करून त्वरित औषधोपचार चालू करावेत. ‘टास्क फोर्स’ सिद्ध करावा, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने औषधसाठा करून ठेवावा.
पूरपरिस्थितीनंतर ३८ सहस्र ४९४ पंचनामे पूर्ण
पूरपरिस्थितीनंतर ३८ सहस्र ४९४ पंचनामे पूर्ण झाले आहेत. ३९ सहस्र ४०० कुटुंबांना धान्य वाटप झाले आहे, तसेच ३९ सहस्र ६९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.’’