हरिद्वार कुंभमेळ्यातील बनावट कोरोना चाचणी प्रकरणात ईडीच्या ४ राज्यांत धाडी

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा घोटाळेबाजांना आजन्म कारागृहात टाका !

नवी देहली – उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एप्रिल मासामध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या वेळी कोरोना चाचणीवरून झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि देहली येथील काही पॅथोलॉजी प्रयोगशाळांवर धाडी टाकल्या. बनावट चाचण्यांच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा उत्तराखंड पोलिसांनी नोंदवला होता.

ईडीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रशासनाने या प्रयोगशाळांना कुंभमेळ्याच्या काळात रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि आर.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्याचे  कंत्राट दिले होते; मात्र या प्रयोगशाळांनी प्रत्यक्षात अगदीच अल्प प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या. तसेच चाचण्या केल्याच्या खोट्या नोंदी केल्या. त्यांनी बनावट देयकेही बनवली. त्या आधारे आर्थिक लाभ करून घेण्याचा त्यांचा हेतू होता. या अंतर्गत ज्या लोकांनी कधीच कुंभमेळ्याला भेटही दिली नाही, अशा लोकांच्या चाचण्या केल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रयोगशाळांनी केलेल्या खोट्या चाचण्यांमुळे कुंभमेळ्याच्या वेळी हरिद्वारमधील कोरोना बाधितांची टक्केवारी ०.१८ इतकी दाखवली गेली; मात्र प्रत्यक्षात ती ५.३ टक्के असल्याचा अंदाज ईडीच्या अधिकार्‍यांनी वर्तवला आहे. उत्तराखंडच्या महसूल खात्याने या चाचण्यांसाठी संबंधित खात्याला ३ कोटी ४ लाख रुपयांचा निधी दिला होता.