सप्तर्षींनी वर्णिलेली परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारकार्याची लीला

नाडीपट्टीचे वाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्

१. महर्षिवर्णित परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्याची महती : सप्तर्षि जीवनाडीपट्टी म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारचरित्र

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सप्तर्षि जीवनाडीपट्टी म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्यक्ष महर्षींनी उलगडून सांगितलेले एक प्रकारचे अवतारचरित्रच आहे. परात्पर गुरु डॉक्टर म्हणायचे, ‘माझे चरित्र कोण लिहिणार ?’ त्यांचे अवतारचरित्र महर्षीच लिहू शकतात आणि आपण केवळ ते ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारलीला’ म्हणून अनुभवू शकतो.

१ अ. सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘परमगुरुजी’ म्हणणे : सप्तर्षि जीवनाडीपट्टीत वसिष्ठ महर्षि परात्पर गुरु डॉक्टरांचा उल्लेख करतांना नेहमी त्यांना ‘परमगुरुजी’ असे म्हणतात. ‘परमगुरुजी हे स्वतः श्रीमन्नारायणाचा अवतार आहेत’, असे ते विश्वामित्रांना सांगतात.

१ आ. योगनिद्रेतील परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य : ‘जसा नारायण शेषावर योगनिद्रेत पहुडला आहे, तसेच परमगुरुजींचे ब्रह्मांडातील कार्य योगनिद्रेतच चालले आहे’, असे ते म्हणतात. (परात्पर गुरु डॉक्टरांना बर्‍याचदा अनिवार गुंगी असते. त्या वेळी होणार्‍या निर्गुण स्तरावरील कार्याला ‘योगनिद्रेतील कार्य’, असे संबोधले जाते.)

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१ इ. ‘परमगुरुजींच्या आज्ञेने आम्ही कार्य करतो’, असे सप्तर्षींनी सांगणे : महर्षि म्हणतात, ‘परमगुरुजींच्या आदेशानेच आमचे कार्य सुरू आहे’; परंतु परात्पर गुरु डॉक्टर म्हणतात, ‘सप्तर्षि सांगतील तसेच आपल्याला करायचे आहे.’ हीच ती परात्पर गुरु डॉक्टरांची ‘अवतारमाया’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य म्हणजे श्रीविष्णूच्या ‘कल्कि’ अवताराच्या कार्याचाच एक अंश ! : ‘युगानुयुगे काळाला धरून भगवंत अवतारी कार्य करण्यासाठी पृथ्वीवर येतच असतो. सध्या कलियुग चालू असल्याने परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीविष्णूच्या ‘कल्कि’ अवताराच्या कार्याचाच एक अंश घेऊन भूमीवर अवतरले आहेत’, असे सप्तर्षि सांगतात.

१ उ. ‘अवताराला मोक्षगती नाही, तर ‘कार्यासाठी परत परत अवतरणे’, असे असल्याने परात्पर गुरु डॉक्टरही याला अपवाद नाहीत’, असे सप्तर्षींनी सांगणे : ‘दर ५०० वर्षांनी अवताराला पृथ्वीवर देवअंशाच्या रूपाने यावे लागते; म्हणून अवताराला मोक्षगती नाही, तर कार्यासाठी परत परत अवतरणे आणि मानवजातीचे कल्याण करणे, असे त्याचे जीवन असते. अगदी असेच देहधारी अवतारी जीवन परात्पर गुरु डॉक्टर जगत आहेत’, असे सप्तर्षि म्हणतात.

२. अवतारी कार्यातील प्रचंड दैवी शक्तीचे देहातील संचारण प्रकृतीला झेपत नसल्याने परात्पर गुरु डॉक्टरांचा देह क्षीण झाल्यासारखा दिसणे

परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती बर्‍याचदा अत्यंत न्यून असते. त्यांना अत्यंत थकवा असतो. याविषयी सप्तर्षि म्हणतात की, स्थूलदेहधारणेला शक्तीचे बंधन येते. काळाला आवश्यक असणार्‍या शक्तीचे ज्या वेळी देहातून संचारण होत असते, त्या वेळी मनुष्यदेहाला तो शक्तीचा प्रचंड ऊर्जास्रोत झेपत नसल्याने देह क्षीण झाल्यासारखा निपचित पडून रहातो.

३. सप्तर्षींनी अशरिरी वाणीने येऊन परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या खोलीत भेटणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीचे दार बंद असतांनाही ‘ते उघडून कुणीतरी खोलीत येत आहे’, असे बर्‍याचदा वाटते. याविषयी सांगतांना सप्तर्षि म्हणाले, ‘ते म्हणजे आम्हीच असतो. आम्ही अशरिरी वाणीने (सूक्ष्मातून) खोलीत प्रवेश करतो आणि परमगुरुजींना भेटून जातो. गेले २५ वर्षे आम्ही त्यांना असे भेटत आहोत.’

४. परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे भूतलावरील मार्गदर्शक महर्षीच !

बर्‍याचदा सप्तर्षि म्हणतात, ‘पुढचा दैवी प्रवास कसा आणि कुठे करावयाचा हे परमगुरुजींनाच विचारा. तसे आपण करू.’ यावरून लक्षात येते की, परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे भूतलावरील मार्गदर्शक महर्षीच आहेत.

५. प्रत्येक युगात घडलेल्या अवतारलीलेचे वर्णन सप्तर्षींनी त्या त्या युगात रामायण, महाभारत यांच्या रूपात लिहून ठेवणे आणि कलियुगातही जीवनाडीपट्टीद्वारे असेच घडले असल्याचे लक्षात येणे

वरील सूत्रांवरून असे लक्षात येते की, प्रत्येक युगात अवतारलीला घडली आणि त्याचे वर्णनही वेगवेगळ्या सप्तर्षींनीच करून ठेवले. त्रेतायुगात रामायण घडले आणि आधीच ते महर्षि वाल्मीकींनी लिहिले. त्यानंतर द्वापरयुगात श्रीकृष्णलीलेचे वर्णन महर्षि वेदव्यासांनी श्री गजाननाकडून महाभारताच्या रूपात लिहून घेतले आणि आताही इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आताच्या कलियुगात प्रत्यक्ष श्रीविष्णूच्या अंशावतारी कल्कि अवताराचे, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरित्रलीलेचे वर्णनही सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या रूपाने सप्तर्षींनीच संवादबद्ध करून ठेवले आहे. यात बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही शंका घेण्याचे कारण नाही. असे प्रत्येक युगातच घडत आले आहे आणि पुढेही घडणार आहे.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२२.११.२०१५)

परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच साधकांना नवग्रहांची कृपा प्राप्त होणे

परमगुरुजींमुळेच आता नवग्रहांचा अनुग्रह (कृपा) साधकांवर होणार आहे. सप्तर्षि म्हणतात, ‘नवग्रह हे भूतलावरील मानवाच्या कर्मगतीवर लक्ष ठेवून असलेले आकाशमंडलातील आमचे डोळे आहेत.’ (‘सध्या विनाशकाळात ग्रहगती ही अत्यंत अनिष्ट मार्गाने सुरू असल्याने इतरांना जरी ती तशी असली, तरी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाछायेतील भक्तांना मात्र ती तशी नाही’, असेच सप्तर्षींना येथे सूचित करावयाचे आहे. जीवनात गुरुकृपा किती महत्त्वाची असते, हेच यातून कळते आणि गुरुकृपा असेल, तर ग्रहही आपल्याला कसे अनुकूल होतात, हेही समजते.)

परमगुरुजींच्या भक्तांना अपाय करू नका, अशी सप्तर्षींनी पंचमहाभूतांना आज्ञा देणे

परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारकार्य समजावतांना सप्तर्षि म्हणतात, ‘आम्ही परमगुरुजींच्या सांगण्यावरून आता पंचमहाभूतांना आज्ञा दिली आहे की, आता तुमचा खेळ पृथ्वीवर सुरू करा; मात्र परमगुरुजींच्या भक्तांना मात्र अपाय (पीडा) होणार नाही, याचे भान ठेवा.’ (सर्वत्र चालू असलेली नैसर्गिक आपत्तींची मालिका पहाता आता प्रत्यक्षातही पंचमहाभूतांचा प्रकोप झाला आहे, हे लक्षात येते ! – संकलक)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक