गोव्यातील भाजपचे नेते राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, तर पी.एस्. श्रीधरन् पिल्लई गोव्याचे नवे राज्यपाल

राष्ट्रपतींकडून ८ राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती

पी.एस्. श्रीधरन पिल्लई

पणजी, ६ जुलै (वार्ता.) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश, त्रिपुरा, हरियाणा, मिझोरम, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या एकूण ८ राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे गोवा विधानसभेचे माजी सभापती तथा गोव्याचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिझोरमचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गतवर्षी ऑगस्ट मासात मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर गोव्यातील राज्यपालपद रिक्त होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार सांभाळत होते.

राज्यपालपद भूषवणारे राजेंद्र आर्लेकर हे तिसरे गोमंतकीय !

राजेंद्र आर्लेकर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर (वय ६७ वर्षे) हे वर्ष २००२ ते २००७ आणि वर्ष २०१२ ते २०१७ या काळात अनुक्रमे वास्को मतदारसंघातून आणि पेडणे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. वर्ष २०१२ ते २०१५ या काळात ते गोवा विधानसभेचे सभापती होते, तर वर्ष २०१५ ते २०१७ या काळात ते वन आणि पर्यावरण, तसेच पंचायतमंत्री होते. एखाद्या राज्याचे राज्यपालपद भूषवणारे ते तिसरे गोमंतकीय ठरले आहेत. यापूर्वी वर्ष १९७१ ते १९७७ या काळात मूळचे आसगाव येथील अँथनी लॉन्सेलोट डायस हे पश्चिम बंगालचे, तर आर्मी जनरल सुनिथ फ्रान्सिस रॉड्रिग्स हे वर्ष २००४ ते २०१० या काळात पंजाब राज्याचे राज्यपाल होते.

भाजपचा सर्वसाधारण कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोचू शकतो हे स्पष्ट झाले ! – राजेंद्र आर्लेकर

माझी राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने भाजपचा सर्वसाधारण कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोचू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. माझी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदावर नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मला संपर्क साधून माझ्याशी चर्चा केली आणि लवकरात लवकर पदभार सांभाळण्यास सांगितले आहे, असे राज्यपालपदी नियुक्ती झालेले राजेंद्र आर्लेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.