मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली १५० मुसलमान नेत्यांशी चर्चा !

चर्चेद्वारे हा प्रश्‍न सुटेल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा करणेच आवश्यक आहे !

नवी देहली – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून १५० मुसलमान नेत्यांशी ४ जुलै या दिवशी चर्चा केली. मुख्यमंत्री सरमा यांनी मागील मासातच सांगितले होते की, सरकार केवळ २ मुले असणार्‍या कुटुंबालाच सरकारी योजनांचा लाभ देणार आहे. याचेच महत्त्व त्यांनी या चर्चेमध्ये या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री सरमा यांनी या चर्चेपूर्वी पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते की, गेल्या मासाभरात मी ‘ऑल आसाम मायनॉरिटी स्टुडंट्स युनियन’च्या लोकांशी चर्चा केली. प्रत्येकाने सांगितले, ‘लोकसंख्या एक समस्या आहे आणि ती सोडवण्याची आवश्यकता आहे.’ आसाममध्ये यावरून कोणताही वाद नाही. लोकांना याचे गांभीर्य लक्षात येत नाही आणि त्यांना वाटते की, भाजप केवळ वाद निर्माण करत आहे. कुणीतरी गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे पाहून लोकांनी या प्रयत्नाचे स्वागत केले पाहिजे. सरकार अल्पसंख्यांकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात प्रतिवर्ष मुसलमानांची लोकसंख्या २९ टक्क्यांनी वाढत आहे, तर हिंदूंची लोकसंख्या केवळ १० टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळेच मुसलमानांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. यासाठीच मुसलमान नेत्यांशी चर्चा करून त्यांना लोकांमध्ये जाऊन यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या समस्येवर दोन मुले ही संकल्पनाच योग्य आहे. यातून राज्यातील गरीब आणि अशिक्षित मुसमालनांची संख्या अल्प करता येऊ शकते.