मुंबई – ७ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून भारतीय टपाल खात्याकडून योगमुद्रेचे चिन्ह असलेल्या विशेष रद्दबादल शिक्क्याचे अनावरण करण्यात आले. हा शिक्का हिंदी आणि इंग्रजी या २ भाषांत सिद्ध करण्यात आला आहे. टपाल तिकिटांचा पुन्हा उपयोग केला जाऊ नये, यासाठी ती तिकिटे रहित करण्यासाठी या शिक्क्याचा उपयोग केला जातो.
मुंबईतील चेंबूर येथील टपाल खात्याच्या कार्यालयाद्वारे योगदिनाच्या निमित्ताने सामाजिक माध्यमाद्वारे या विशेष चिन्हांची माहिती प्रसारित करण्यात आली. कार्यालयाच्या आवारात ‘योगाची आवश्यकता आणि तिचे महत्त्व’ या विषयीचा मोठा फलक ही लावण्यात आला. भारतीय टपाल खात्यामध्ये अनेक वर्षांपासून असे शिक्के वापरले जातात. अनेक व्यक्तींना ऐतिहासिक मुद्रांक, तिकिटे आणि शिक्के यांचा संग्रह करण्याचा छंद असतो. या नागरिकांनाही प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे टपाल खात्याकडून सांगण्यात आले. भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हा योगमुद्रा असलेला शिक्का नागरिकांना उपलब्ध होणार आहे.