‘सीरम’च्या ‘कोवोवॅक्स’ चाचण्यांना केंद्राकडून अनुमती नाकारली !

पुणे – संपूर्ण देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची तसेच यामध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली आहे; मात्र २ ते १७ वर्षे वयाच्या मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास सिरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारच्या केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या (सी.डी.एस्.सी.ओ.) तज्ञ समितीने अनुमती नाकारली आहे. भारतामध्ये १० ठिकाणी २ ते १७ वर्षे वयोगटातील मिळून ९२० मुलांवर कोवोवॅक्स लसीची दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणी करण्याची अनुमती सिरम इन्स्टिट्यूटने औषध महानियंत्रकांकडे मागितली होती; मात्र ती अमान्य केली आहे. कोवोवॅक्सच्या प्रौढ व्यक्तींच्या चाचण्यांचा हा अहवाल प्रथम सादर करा. त्यानंतरच लहान मुलांच्या चाचण्यांच्या अनुमतीचा विचार करता येईल, असे समितीने म्हटले आहे.