श्री विठ्ठल मंदिरात १ सहस्र वर्षांपूर्वीच्या विविध धातूंच्या मूर्ती दर्शनासाठी ठेवणार !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना आता ७०० ते १ सहस्र वर्षांपूर्वीच्या विविध धातूंपासून बनवलेल्या सुंदर मूर्ती पहाता येणार आहेत. १ ते २ फूट उंचीच्या ८० मूर्ती श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपातील एका ओवरीत ठेवण्यात येणार असून भाविकांना त्यांचे काचेतून दर्शन घेता येणार आहे.

१. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरीजवळ मंदिराच्या भिंतीलगत गोवोगावच्या लोकांनी दिलेल्या अनेक धातूंच्या मूर्ती असलेले ३३ कोटी देवतांचे छोटे मंदिरच होते. मागील ७०० ते ८०० वर्षांपासून पंढरपूर येथील बैरागी घराण्याकडून अशा मूर्ती श्री संत नामदेव पायरीजवळ स्वीकारून त्या मूर्तींचे पूजन केले जात होते.

२. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वर्ष १९९७ मध्ये संत नामदेव महाद्वाराचे बांधकाम चालू केले होते. त्या वेळी हे मंदिर पाडण्यात आले होते. भिंतीलगत असलेल्या या मंदिरातील २५० ते ३०० मूर्ती मंदिर समितीने कह्यात घेतल्या होत्या. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री गणपति, श्रीविष्णु, श्रीकृष्ण, बालाजी अशा अनेक देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत. त्यातील निवडक ८० मूर्ती भाविकांना पहाण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

३. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी आहे; मात्र भाविकांसाठी मंदिर खुले होईल, तेव्हा भाविकांना या मूर्ती पहाता येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली.