|
पुणे – या वर्षी औद्योगिक क्षेत्र आणि वाहतूक पूर्ववत् झाल्याने हवेतील सूक्ष्म आणि अतीसूक्ष्म धूलिकणांत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे केवळ हिवाळ्यातच नाही, तर उन्हाळ्यातही वायूप्रदूषणाची समस्या समोर येत आहे. गेल्या ३ वर्षांत उन्हाळ्यातील वायूप्रदूषणातही वाढ झाली असून उन्हाळ्यात सर्वाधिक वायूप्रदूषण नोंदवल्या जाणार्या राज्यांतील १० ‘हॉटस्पॉट’मध्ये पुण्यातील ३ ठिकाणांचा समावेश झाला आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक वायूप्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ मुंबईत आहेत.
केंद्र सरकारच्या ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ अंतर्गत निवडलेल्या राज्यांतील हवेचे ‘एन्.सी.ए.पी. ट्रॅकर’ या यंत्रणेकडून नियमित मूल्यांकन केले जाते. ‘कार्बन कॉपी’ आणि ‘रिस्पायर लिव्हिंग सायन्स’ या संस्थांनी ही यंत्रणा विकसित केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यासाठी माहिती पुरवते.
डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे यावर संशोधन करून मूळ शोधण्याची आवश्यकता आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय शोधणे सोपे होईल. कोरोनाकाळातही नागरिकांना प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत आहे, यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अल्प होऊ शकते. (स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षे होऊनही जनतेला शुद्ध हवा न मिळणे चिंताजनक आहे. सर्वपक्षीय सरकारांना हे लज्जास्पद ! – संपादक)