‘पेटा’ची पापे

भारताशी छुपे युद्ध करणार्‍या देशांच्या व्यतिरिक्त अनेक छुप्या शक्ती भारतीय संस्कृतीच्या मुळावर उठल्या आहेत. त्यांपैकीच एक अमेरिकेतील ‘पेटा’(पिपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट फॉर ॲनिमल्स) ही अशीच ढोंगी आणि हिंदुद्वेषी संस्था आहे. बुद्धीच्या पलीकडील खुसपटे काढून आणि उलटा घास घेऊन ती तथाकथित प्राणीप्रेमाच्या नावाखाली भारतियांना काही ना काही सल्ले देत असते. अमेरिकेत वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती होते आणि तिचे सदस्य वेगवेगळ्या देशांत निर्माण करून त्या संस्था स्वयंघोषित आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून पुढे येतात. भारतासारख्या विकसनशील देशांना त्या त्यांच्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा संस्था बुद्धीजीवींच्या ‘आदर्श’ असतात आणि सामान्य भारतीय माणसाला त्यांच्याविषयी काहीही माहिती नसते; पण जे जे विदेशी ते चांगले, अशी सामान्य भारतियांचीही मानसिकता असते. याचा सर्वाधिक लाभ भारतीय संस्कृतीला तुच्छ लेखणारे भारतातील त्यांचे अनुयायी घेतात. ‘पेटा’ या संस्थेचेही असेच काहीसे आहे. भारतात तिचे अनुयायी अशाच हिंदुद्वेषी भूमिका राबवत असतात. पर्यावरणप्रेमींसारखे त्यांचेही काळे कारनामे जणू हिंदूंच्या प्रथा, परंपरा यांवर घाला घालत असतात. विश्वातील सर्वांत मोठी पशू अधिकार संस्था असल्याच्या नावाखाली ‘पेटा’ ही संस्था भारतातील अनुयायांच्या माध्यमातून हिंदूंवर दबाव टाकण्याचाच प्रयत्न करत आहे’, असे म्हटले, तर चूक नव्हे.

‘अमूल’ची कणखर भूमिका योग्यच

काही दिवसांपूर्वीच या संस्थेने ‘अमूल’ या पूर्णतः भारतीय आणि जगप्रसिद्ध दूध आस्थापनाला पत्र लिहिले आणि सांगितले, ‘प्राण्यांपासून दूध काढणे ही क्रूरता आहे; म्हणून तुम्ही काही वनस्पतींपासून दूध काढा.’ ‘सोयाबीन, बदाम, शेंगदाणे आदींच्या वनस्पतींपासून पूर्णतः शाकाहारी असे ‘वेगन मिल्क’ काढा’, असे या संस्थेचे म्हणणे आहे. हे वाचून कुणा सच्च्या भारतियाची तळपायाची आग मस्तकात जाणार नाही ? लक्षावधी वर्षे गोमातेचे पूजन करून तिचे दूध पिणार्‍या सहिष्णु भारतियांना, प्रतिदिन गायीसह अन्य प्राण्यांचे मांस खाणार्‍या अमेरिकेतील संस्थेने असे सल्ले द्यावेत, हा आंतरराष्ट्रीय आस्थापनांच्या गोबेल्स नीतीचाच एक भाग आहे. कुणाकुणाचे हात यात गुंतले असतील आणि कुणाकुणाचे लागेबांधे असतील, याची कल्पनाही करू शकत नाही. वरील तिन्ही उत्पादनांवर सध्या विदेशी आस्थापनांचे वर्चस्व जगात आहे. त्यांचा कारभार वाढावा म्हणून ही चाल असल्याचा मोठा संशय त्यामुळे बळावला आहे. या संदर्भात एक चांगली गोष्ट झाली की,‘अमूल’चे संचालक आर्.एस्. सोढी यांनी या संस्थेचे पत्र सामाजिक माध्यमांत प्रसारित केले आणि स्वतःही त्यांचा खरपूस समाचार घेतला. यामुळे जनजागृती झाली आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर पर्यायाने भारतावर कब्जा करण्यासाठी कोण कोण कसे टपून बसले आहेत ? तेही या निमित्ताने बाहेर आले. आज अमूल आस्थापन थेट शेतकर्‍यांकडून दूध विकत घेते. १० कोटींहून अधिक शेतकर्‍यांचे पोट त्यावर आहे. त्यांच्या हातातोंडाचा घास काढून विदेशी आस्थापनांच्या उत्पादनांचे नकली दूध काढण्यास ही संस्था भारतासारख्या देशाला सांगू धजावते, हेही लक्षात घेतले पाहिजे. आज भारतात दुग्ध व्यवसायाची उलाढाल वर्षाला ८ लाख कोटी इतकी आहे. यावर आघात करून वनस्पतींचे दूध काढणे, हा किती मोठा आत्मघात होऊ शकतो, याची कल्पना येईल. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विरोधातील हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे. शेतकर्‍यांसह सहस्रो अन्य व्यावसायिकांना देशोधडीला लावणारे हे बहुराष्ट्रीय आस्थापनांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी प्रत्येक भारतियाने ठामपणे पुढे आले पाहिजे आणि याला जोरदार विरोध केला पाहिजे.

स्थानिक घरभेदी !

‘पेटा’चा पुरस्कार करणार्‍या भारतियांचे डोळे कधी उघडणार ? हा आता प्रश्न आहे. भारतियांची फूस असल्याशिवाय ही संस्था भारताच्या पारंपरिक गोष्टींवर अशा प्रकारे आघात करण्यास धजावणार नाही, हेही निश्चित ! काही दिवसांपूर्वी भारतातील या संस्थेच्या अनुयायांनी ‘चमडामुक्त राखी’ अशी पोस्टर्स लावली, तेव्हा आश्चर्याला पारावार उरला नाही. राखीत चामडे कुठे असते ? त्या वेळी ‘पेटा इंडिया’च्या समन्वयक राधिका सूर्यवंशी यांनी ‘गायी आमच्या बहिणीसारख्या आहेत, त्यांच्या रक्षणासाठी हे आहे’, असे अत्यंत हास्यास्पद उत्तर दिले. भारतियांना गाय मातेच्या स्थानी असतांना ती बहीण कुठून झाली ? तमिळनाडूतील ‘जल्लीकट्टू’ या बैलांच्या धावण्याच्या स्पर्धेला क्रूरतेच्या नावाखाली विरोध करण्यात आला. त्यानंतर या स्पर्धेचे गोधनाच्या प्रजोत्पादनाच्या दृष्टीने होणारे लाभ लक्षात आले. त्यानंतर स्थानिकांनी पुष्कळ मोठे आंदोलन करून हा विरोध मोडून काढला. आज भारतातील अनेक राज्यांत गोवंशहत्या बंदी असूनही कित्येक अवैध पशूवधगृहांतून गोवंशियांची चालणारी हत्या ‘पेटा इंडिया’च्या अनुयायांना दिसत नाही का ? बकरी ईदच्या दिवशी लाल झालेले नाल्यांचे पाणी या संस्थेच्या अनुयायांना दिसत नाही का ? देशभर चाललेली गोवंशियांची तस्करी या संस्थेच्या अनुयायांना दिसत नाही का ? भारत जगातील प्रथम क्रमांकाचा मांस निर्यात देश आहे, हे या अनुयायांना दिसत नाही का ? कि या संदर्भात गांधींच्या तीन माकडांप्रमाणे भूमिका घेऊन ते बसलेले असतात ?

अमेरिकेसह जगातील सर्वच इस्लामी आणि ख्रिस्ती देश प्रतिदिन विविध प्रकारच्या प्राण्यांना मारून मांसाहार करतात; किंबहुना कित्येक देशांचे तेच मुख्य अन्न आहे. भारत हा जगातील एकमेव शाकाहारी देश आहे. शाकाहाराचे लाभ लक्षात घेऊन आता विदेशी शाकाहारी होत आहेत. असे असतांना कृषीप्रधान भारताला प्राणीप्रेमाचे गोडवे शिकवण्याची पेटाची पात्रता तरी आहे का ? या संस्थेच्या नावाचा मराठी अर्थ असा आहे, ‘प्राण्यांशी योग्य वर्तणूक करणारे किंवा त्यांना नैतिक वागणूक देणारे लोक’. ज्या हिंदूंच्या देवतांची वाहनेही विविध पशू आणि पक्षी आहेत, त्यांच्यासाठी ती तितकीच पूजनीय आहेत. असे असतांना बहुसंख्य भारतियांना म्हणजेच हिंदूंना प्राण्यांशी कसे वागायचे ? हे विदेशींनी शिकवण्याची आवश्यकता नाही.

४० मिलियन डॉलरचा लेखाजोखा करणारी ही संस्था अशा प्रकारच्या हिंदु धर्मावर आघात करणार्‍या कामांसाठीच अधिकाधिक व्यय करते, हे वेगळे सांगायला नकोच. प्रत्येक भारतीय ठाम राहिला, तर पेटासारख्या संस्था आणि त्यांचे अनुयायी यांची डाळ इथे शिजणार नाही, हेही तितकेच खरे !