जोपर्यंत लोकांना भडकावून हिंसा घडवली जात नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – नागरिक म्हणून प्रत्येकाला सरकार आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्याकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार आहे. या टीकेमुळे सरकारच्या विरोधात हिंसा करून अशांतता निर्माण केली जात नाही, तोपर्यंतच हा अधिकार मर्यादित आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. पत्रकार विनोद दुआ यांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा रहित करतांना न्यायालयाने हे मत मांडले. गेल्या वर्षी शिमला येथे भाजपचे नेते श्याम यांनी दुआ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केल्यावर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

न्यायालयाने म्हटले की, दुआ यांनी केलेली विधाने सरकार आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांचे काम यांना नाकारणारी असून ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आहे. कारण अशा टीकेतून अधिक चांगल्या प्रकारे कार्य करता येऊ शकते. त्यामुळे ती टीका लोकांना भडकावण्याच्या उद्देशाने केलेली नव्हती की, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍न निर्माण होईल.