हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
सामान्य व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडतांना अनेक निर्बंध पाळावे लागतात, त्या काळात चोरटे असे बिनबोभाट कसे काय फिरतात ?
माशेल, १ जून (वार्ता.) – खांडोळा, माशेल येथील श्री शांतादुर्गा मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार ३१ मे या दिवशी उघडकीस आला. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून श्रींच्या मूर्तीवरील १४.७ ग्रॅम वजनाचे (३३ सहस्र रुपये किमतीचे) सोन्याचे दागिने (दावल) चोरले आहे. सकाळी पुजारी पूजेसाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे राज्यात संचारबंदी लागू असतांना आणि ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असतांना हा प्रकार घडला आहे.
फोंडा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी मुख्य दाराची कडी तोडून मंदिरात प्रवेश केला. मूर्तीच्या अंगावर दागिने असल्याचे चोरट्यांनी हेरलेले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांत रीतसर तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.