शिवराज नारियलवाले यांच्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस महानिरीक्षक

  • भाजपचे शिवराज नारियलवाले यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकरण

  • अपर पोलीस अधीक्षक प्रकरणाची चौकशी करणार !

जालना – २ लाख रुपयांची लाच घेणारे निलंबित पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना अमानुष मारहाण केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिला आहे. ‘येथील अपर पोलीस अधीक्षक या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती प्रसन्ना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

९ एप्रिल २०२१ या दिवशी येथील पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह काही पोलीस कर्मचार्‍यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना काठी तुटेपर्यंत अमानुष मारहाण केली होती.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांच्या या निर्दयी मारहाणीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.

रुग्णालयातील अतीदक्षता विभागाची तोडफोड केल्याने मारहाण केली ! – प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक

याविषयी कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन खुलासा करतांना म्हणाले, ‘‘९ एप्रिल या दिवशी जालना येथील एका अपघातग्रस्त युवकाचा रुग्णालयात उपचाराच्या वेळी मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आधुनिक वैद्यांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी रुग्णालयात काचा फोडून धुडगूस घातला. या प्रकरणी पोलिसांनी पोलीस ठाण्यात अज्ञात ३ – ४ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्या दिवशी पोलिसांनी रुग्णालयामधील अतीदक्षता विभागाची शिवराज नारियलवाले यांनी तोडफोड केली म्हणून त्यांना मारहाण केली.’’

पोलिसांची शिवीगाळ ध्वनीमुद्रित केल्यामुळे शिवराज नारियलवाले यांना मारहाण !

नारियलवाले यांनी सांगितले की, तोडफोडीचा आणि माझा संबंध नाही. रुग्णालयाच्या आवारात पोलीस माझ्यासारख्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला शिवीगाळ करतांनाचे मी पाहिले होते. तीच पोलिसांची शिवीगाळ भ्रमणभाषमध्ये ध्वनीमुद्रित केल्यामुळे पोलिसांनी मला मारहाण केली.

पोलीस अधिकार्‍यांचे वागणे अतिरेक्याप्रमाणे ! – बबनराव लोणीकर, माजी मंत्री

माजी मंत्री बबनराव लोणीकर पोलिसांच्या मारहाणीची निंदा करतांना म्हणाले, ‘‘या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकार्‍यांचे वागणे अतिरेक्यासारखे आहे. मारहाण करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे त्वरित निलंबित करावे, अन्यथा विधीमंडळ अधिवेशनात हे सूत्र लावून धरू.’’

सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स

अमानुष मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

शिवराज नारियलवाले यांचा कुठलाही गुन्हा नसतांना त्यांना अमानुषपणे मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी २८ मे या दिवशी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे की,

१. शिवराज हे रुग्णालयात बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच वेळी गवळी समाजाच्या एका युवकाचा तिथे अपघाती मृत्यू झाला. तिथे काही लोक धुडघूस घालत होते. उपस्थित पोलीस गवळी समाजाविषयी शिवीगाळ करत होते. शिवराज यांनी पोलिसांची शिवीगाळ भ्रमणभाषमध्ये चित्रित केली.

२. त्याचा राग धरून गणवेशातील ६ आणि गणवेशात नसलेले २, असे ८ पोलीस त्यांना घेरून अमानुष मारहाण करत होते. डोक्यावरही मारहाण करण्यात आली.

३. रुग्णालयात धुडगूस घालणार्‍या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. यात पोलीस उपअधीक्षकाचा समावेश असणे, हे आणखी गंभीर आहे.

४. नारियलवाले यांचा कुठे दोष असेल, तर गुन्हा नोंद करून रितसर कारवाई करता आली असती; पण सराईत गुन्हेगारापेक्षाही भयंकर पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

५. जवळजवळ दीड मास नारियलवाले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते. शिवीगाळ केलेला व्हिडिओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती.

६. अखेर पोलीस उपअधीक्षक खिरडकर अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात लाच घेतांना निलंबित झाले. त्यानंतर त्या कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड मासाने हा प्रकार समोर आला. अन्यथा हा प्रकार कधीच उघडकीस आला नसता.