मरण स्वस्त आहे का ?

‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर मुंबई येथील अरबी समुद्रात अडकलेले ४ तराफे आणि त्यामध्ये अडकलेले संबंधित आस्थापनाचे कर्मचारी यांना वाचवण्यासाठी ‘आय्.एन्.एस्. कोलकाता’ आणि ‘आय.एन्.एस्. कोची’ या नौदलाच्या लढाऊ जहाजांद्वारे बचाव कार्य करण्यात आले. ६५० हून अधिक जणांचे प्राण पणाला लागले होते. अनेकांना सुखरूप वाचवण्यात यश आले, तर काहींचे मृतदेह सापडले; पण महत्त्वाचे सूत्र असे आहे की, हवामान विभागाकडून ४ दिवस आधीपासूनच वादळाची चेतावणी आणि त्याचा वेग यांविषयी सांगितलेले असूनही हे तराफे समुद्रात काय करत होते ? याविषयी ‘अ‍ॅफकॉन्स’ या संबंधित आस्थापनाने कॅप्टनकडे बोट दाखवले. मुळात कॅप्टनने परत न येण्याचा निर्णय जरी घेतला, तरी आस्थापनाचा त्यावर अंकुश कसा नाही ? शेकडो लोकांना मरणाच्या हवाली कसे काय दिले ? यात आस्थापन दोषी आहे का ? निवळ कारवाईचा ससेमिरा चुकवण्यासाठी कॅप्टनला बळीचा बकरा केले जात आहे का ? ‘मुंबई हाय’सारख्या खोल समुद्रात वादळामुळे काय होऊ शकते ? याचा अंदाज ‘कॅप्टन’ला आला नाही, असे कसे म्हणणार ? असे प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यावाचून रहात नाहीत. अर्थात् सत्य काय ? हे त्या कॅप्टनलाच ठाऊक ! त्याने समोर येऊन त्याचा उलगडा करण्याची शक्यता धूसर आहे. म्हणूनच आस्थापनाच्या भूमिकेविषयी संशय बळावतो.

तराफ्यांवर अडकलेल्यांना वाचवण्यासाठी नौदलाने केलेली कामगिरी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. त्यात त्यांना चांगल्या प्रकारे यशही मिळाले; मात्र योग्य काळजी न घेतल्यामुळे नौदलाला अनावश्यक खटपट करावी लागली, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? या बचावकार्यासाठी नौदलाचा झालेला आर्थिक व्यय, लागलेले मनुष्यबळ, सर्वांचा वेळ हे वेळीच तराफे किनारपट्टीवर न लावल्यामुळे खर्ची पडले.

आज देशासमोर अंतर्गत आणि बाह्य अशी अनेक आव्हाने असतांना देशाचे मनुष्यबळ, पैसा आणि इंधन या सर्वांचा योग्य विनियोग होणे अपेक्षित आहे. ही घटना दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नसून प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समाजासमोर आणावे, हीच अपेक्षा !

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी