‘म्युकरमायकोसिस’मुळे सोलापूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू

सोलापूर – जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ७५ हून अधिक रुग्ण आढळले असून एका सप्ताहात ४ रुग्ण दगावले आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाकडून या आजाराची माहिती लपवण्यात येत आहे. ‘म्युकरमायकोसिस’ने मृत्यू झालेले रुग्ण प्रारंभी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याने रुग्णालयात भरती झाले होते. कोरोना बरा होण्यापूर्वी दहा दिवसांतच रुग्णांची प्रकृती खालावू लागली. पडताळणीमध्ये हे रुग्ण ‘म्युकरमायकोसिस’ने बाधित झाल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाच्या लक्षात आले. रुग्णांच्या कुटुंबियांना रुग्णाला म्युकरमायकोसिस झाल्याचे सांगितले असले, तरी मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद केलेली आहे.

‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारासाठी इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाच्या कुटुंबियांची धावपळ

मागील काही दिवसांपासून कोरोनातून बरे झालेल्या वृद्ध आणि अन्य आजार असणार्‍या रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार होत आहे. या संदर्भातील उपचार घेण्यासाठी सोलापूर येथील नाक, कान आणि घसा तज्ञांकडे मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. सद्य:स्थितीत सोलापूर येथे २०० ते ३०० रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. ‘म्युकरमायकोसिस’ उपचारात महत्त्वपूर्ण असलेले इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या कुटुंबियांची धावपळ होत आहे.