लाचखोरांवर आतापर्यंत कठोर कारवाई झाली असती, तर कोरोनाच्या संकटकाळात त्यांना पकडण्यासाठी व्यय होणारा वेळ आणि मनुष्यबळ वाचवता आला असता !
पुणे, १७ मे – राज्याच्या लाचलुचपत विभागाने ११ मे पर्यंत राज्यात २७७ सापळे रचून ३७६ आरोपींना पकडले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
संभाजीनगर विभागात सर्वाधिक ८२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यानंतर नाशिक विभागात ६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे विभागात ६३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यावर पुणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे म्हणाले, ‘‘विभागाकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे अल्प तक्रारी आल्या असू शकतात. तक्रारदाराच्या तक्रारीवरून कारवाई केल्यानंतर कायदेशीर काम पूर्ण करून देण्यासाठी पाठपुरावा केला जातो.’’