गोव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण घटून ३५.१६ टक्के

पणजी – गोव्यात १३ मे या दिवशी ६३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ७ सहस्र ८४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २ सहस्र ४९१ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटून ३५.१६ टक्के झाले आहे. दिवसभरात २ सहस्र २६६ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित २०१ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ३२ सहस्र ९५३ झाली आहे. राज्यातील १३ आरोग्य केंद्रांमध्ये सध्या १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. १३ मे या दिवशी वाळपई आरोग्य केंद्राची यात भर पडली, तर खोर्ली आरोग्य केंद्र ९०८ रुग्णांसह काठावर आहे.

‘गोवा फॉरवर्ड’ची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ‘नोडल’ अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी तक्रार

‘गोवा फॉरवर्ड’ने राज्यात ऑक्सिजनच्या अभावी झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे मुख्य सचिव आणि गोमेकॉतील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले ‘नोडल’ अधिकारी यांच्या विरोधात पोलिसांकडे गुन्हेगारी स्वरूपाची तक्रार प्रविष्ट केली आहे.