प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासंबंधी उपाययोजनांची न्यायालयाला माहिती

डुरा सिलिंडर

पणजी – आरोग्य खात्याचे सचिव रवि धवन आणि गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी राज्यशासनाच्या वतीने ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासंबंधी उपाययोजनांविषयी खंडपिठाला पुढील माहिती दिली.

१. १२ मेच्या रात्री मागणीनुसार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. या वेळी ऑक्सिजन ट्रॉलीची ने-आण करण्यासाठी पोलिसांनीही हातभार लावला.

२. ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अल्प वेळेत व्हावा, यासाठी ‘ग्रीन कॉरिडोअर’ सिद्ध करण्यात आला आहे.

३. गोमेकॉत डुरा सिलिंडर बसवून ते आजच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

४. वायूदलाच्या विमानाने ३२३ हॉय अँड ऑक्सिजन कन्स्ट्रेटर्स गोव्यात आणले आहेत आणि हे ऑक्सिजन कन्स्ट्रेटर्स गोमेकॉला आजच वापरता येणार आहेत.

५. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतून ट्रॅक्टरचालक गोव्यात आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

६. गोमेकॉत मेसर्स प्रेक्सएअर इंडिया प्रा.लि. कंपनी १७ मेपर्यंत नवीन ऑक्सिजन साठवणूक टाकी बसवणार आहे. ही टाकी बसवल्यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.

७. गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याने केंद्रशासनाने गोव्यासाठीचा ऑक्सिजनचा साठा वाढवून दिला आहे. केंद्राकडून ऑक्सिजनचा हा वाढीव साठा मिळवण्यासाठी राज्यशासन सातत्याने पाठपुरावा करेल.

८. ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी १२ मे या दिवशी जी स्थिती आहे, ती स्थिती पुढील काही दिवस तशीच रहाण्याची शक्यता आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.

९. गोमेकॉतील अत्यवस्थ रुग्णांना गोमेकॉच्या सूपरस्पेशालिटी विभागात स्थलांतर करण्यात येत आहे.