महानगरपालिका न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार !

न्यायालयाने सादर केलेली आणि प्रत्यक्षातील आकडेवारी यात तफावत ! – महापौरांचा आरोप

मुरलीधर मोहोळ

पुणे – मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील वाढत्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त करून रुग्ण संख्या जास्त असणाऱ्या शहरांमध्ये दळणवळण बंदी लागू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली, तसेच पुणे महापालिकेचे आयुक्त मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी का बोलत नाहीत ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी विचारला.

मात्र प्रत्यक्षातील आकडेवारी आणि न्यायालयाने सादर केलेली आकडेवारी यात तफावत असल्याचा गंभीर आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. पुणे शहरातील स्थिती चांगली असून नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला; पुणे शहरात परिस्थिती चांगली असून जनजीवन सुरळीत होण्यासाठी चांगलं वातावरण आहे. न्यायालयाने सादर केलेल्या आकडेवारीमुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून याविषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. पुण्यामध्ये कडक दळणवळण बंदीची गरज नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.