उजनीच्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही !

खडकवासला धरण विभागाचे स्पष्टीकरण

 

सोलापूर – उजनीच्या मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून येणारे पाणी इंदापूर तालुक्याला दिले जाणार आहे. उजनीच्या मूळ पाणी वाटपात कोणताही हस्तक्षेप नाही, असे स्पष्टीकरण खडकवासला धरण विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहे. उजनीचे पाणी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी पळवल्याचे आरोप केल्या काही दिवसांपासून होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खडकवासला धरण विभागाने दिलेले हे स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, उजनीच्या पाण्याचा लाभ इंदापूर तालुक्यातील जवळपास १६ सहस्र हेक्टर क्षेत्राला होणार आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा एकूण ११७ टी.एम्.सी. इतका आहे, तर मृतसाठा ६३.६६ टी.एम्.सी. इतका आहे. वापराचा साठा ५३.५७ टी.एम्.सी. इतका आहे. उजनी प्रकल्प आणि त्यावरील सर्व उपसा सिंचन पाणी पुरवठा आणि औद्योगिक पाणी वापर असे एकूण ८४.३४ टी.एम्.सी. पाणी वापराचे नियोजन आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यासाठी प्रस्तावित असलेल्या शेटफळगढे उपसा सिंचन योजनेसाठी उजनी जलाशयाच्या प्रकल्पीय पाणी वापरामध्ये कोणताही पालट करणे प्रस्तावित नाही.