वरिष्ठ अधिकारी नोकराप्रमाणे वागणूक देत असल्याने पोलिसाचे त्यागपत्र !

  • वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून कनिष्ठ पोलिसांना घरगड्याप्रमाणे वागणूक दिल्याचे प्रकार सर्रास घडतात. असल्या प्रकारांची चौकशी होऊन पोलीसदलात परिवर्तन होणे आवश्यक !
  • संबंधित पोलिसाने केलेल्या तक्रारीत तथ्य असेल, तर त्यांनी दिलेल्या निवेदनाची पोलीस अधिकारी नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का ?

धमतारी (छत्तीसगड) – वरिष्ठ पोलीस अधिकारी घरातील भांडी घासून घेतात, माळी काम करवून घेतात आणि अडचणी मांडल्यास शिवीगाळ करतात हे आणि अन्य आरोप करत उज्ज्वल दिवाण या पोलिसाने पोलीस अधीक्षकांना स्वतःचे त्यागपत्र सोपवत निवेदन सादर केले. उज्ज्वल दिवाण यांनी त्यांना झालेल्या त्रासाच्या संदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केला आहे.

दिवाण यांच्या सादर केलेल्या निवेदनात त्यांनी वरिष्ठांकडे त्यांना आलेल्या अडचणी मांडल्यास त्यांना जुन्या पोलीस ऍक्टचा संदर्भ देऊन शिवीगाळ करण्यात येत असे, असे म्हटले आहे. तसेच स्वतःच्या अधिकारांविषयी बोलल्यास त्यांनाच नोटीस बजावणे, त्यांनी तक्रार केल्यास कोणताही तपास न करता निलंबन करणे असले प्रकार वरिष्ठांकडून होत असत. ‘कोरोना संक्रमणाच्या काळात एका दिवसाचे वेतन कापू नये, यासाठी शासन दरबारी पत्र लिहून अनेक तक्रारी केल्या. त्यामुळे माझेे नक्षलग्रस्त भाग मेचका येथे स्थानांतर करण्यात आले. मी त्याठिकाणी जाण्यास सिद्ध होतो; परंतु मला त्यासाठी पुरेसा वेळा नाही’, असे दिवाण यांनी निवेदनात म्हटले आहे. उज्ज्वल दिवाण हे गेली ११ वर्षे पोलीसदलात कार्यरत आहेत. त्यांचे त्यागपत्र पोलीस अधीक्षकांनी जरी स्वीकारले असले, तरी ते मंजूर करण्यात आले नसल्याचे कळते.

याविषयी प्रतिक्रिया देतांना ‘उज्ज्वल दिवाण यांचे स्थानांतर प्रशासकीय आदेशानुसार झाले असून त्याठिकाणी ते गेले नाहीत. त्यांनी अनेक कारणे दिली. हे एका पोलिसाला शोभनीय वर्तन नाही, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीषा ठाकूर यांनी सांगितले.