जिल्हा रुग्णालयात ‘प्लाझ्मा’ देण्यासाठीचे यंत्र उपलब्ध करून द्यावे ! –  देव्या सूर्याजी, अध्यक्ष, युवा रक्तदाता संघटना

सावंतवाडी – कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता गंभीर रुग्णांना ‘प्लाझ्मा’ हा  जीवनदायिनी ठरत आहे; मात्र जिल्ह्यात ‘प्लाझ्मा डोनेट मशीन’ उपलब्ध नाही. पर्यायाने अनेक रुग्णांचे प्राण जात आहेत. त्यामुळे ‘प्लाझ्मा डोनेट मशीन’ सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अथवा कुडाळ येथील महिला रुग्णालयात संमत झालेल्या नव्या रक्तपेढीत उपलब्ध करावे, अशी मागणी सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केली आहे.

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना प्लाझ्मा मिळवणे म्हणजे मोठे अग्नीदिव्य असून प्लाझ्मा देण्यासाठी कोरोनाच्या संसर्गातून बरी झालेली आणि त्याच रक्तगटाची व्यक्ती शोधतांना रुग्णांच्या नातेवाइकांचे अक्षरशः हाल होत आहेत. त्यात त्या व्यक्तीला कोरोनातून बरे होऊन २८ दिवस होणे आवश्यक आहे, तर ४ मासांच्या आतच बरी झालेली व्यक्ती प्लाझ्मा देऊ शकते; मात्र अशा परिस्थितीत जरी प्लाझ्मा देणारी व्यक्ती मिळाली, तरी प्लाझ्मा घेण्याचे यंत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे  गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांना रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा या ठिकाणी नेल्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. प्लाझ्मा घेण्याचे यंत्र उपलब्ध झाल्यास रुग्णांच्या नातेवाइकांचे, तसेच प्लाझ्मा देणार्‍या व्यक्तीचेही हाल थांबतील आणि कोरोनाबाधित रुग्णांची सोय होऊन अनेक रुग्णांचे जीव वाचतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ‘प्लाझ्मा डोनेट मशीन’ उपलब्ध करून द्यावे, असे सूर्याजी यांनी म्हटले आहे.