राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून तातडीने उपाययोजना करा ! – निवासी डॉक्टरांच्या संघटनेची आरोग्यमंत्र्यांकडे पुन्हा मागणी

पणजी – ‘राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा प्रामुख्याने जाणवू लागला आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे’, अशी मागणी ‘गार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने पुन्हा केली आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यासमवेत ४ मे या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गार्ड’ने ही मागणी केली. ‘गार्ड’ने बैठकीत पुढे अतिरिक्त आरोग्य कर्मचारी, ऑक्सिजनचा तुटवडा आणि अन्य समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी म्हणाले, ‘‘रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे दायित्व मी घेतले आहे. मी ‘गार्ड’च्या सदस्यांसमवेत बैठक घेणार आहे. रुग्णालयातील प्रत्येक प्रभागवार ऑक्सिजनचा पुरवठा तपासला जाईल.’’

एकाच दिवसात ११ डॉक्टर कोरोनाबाधित

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असतांना डॉक्टरच कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. ३ मे या एकाच दिवशी ११ डॉक्टर कोरोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती ‘गार्ड’ संघटनेने दिली. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आतापर्यंत ४० हून अधिक डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत.

शासकीय रुग्णालयाच्या ‘कोविड वॉर्ड’मध्ये तातडीने अतिरिक्त परिचारिका नेमा ! – परिचारिका संघटनेची मागणी

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तातडीने अतिरिक्त परिचारिका नेमण्याची मागणी ‘ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया’च्या गोवा विभागाने आरोग्य खात्याच्या सचिवांकडे एक पत्र पाठवून केली आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही परिचारिकांची कमतरता दूर करण्यात आलेली नाही. कोरोनाचे रुग्ण हाताळण्यासाठी परिचारिकांना पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक रुग्णाची मागणी पूर्ण करण्यासाठी परिचारिकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. प्रत्येक प्रभागात एक परिचारिका ३० ते ४० रुग्णांची सोय पहाते. अनेक वेळा रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक अयोग्य वर्तन करत असूनही परिचारिकांन सेवा बजावावी लागत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे.’’