चिमणगाव (जिल्हा सातारा) येथील रेशन दुकानामध्ये अवैधरित्या मद्यविक्री

७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन

प्रातिनिधिक छायाचित्र

सातारा, ३ मे (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे एका रेशन दुकानातच अवैधरित्या मद्यविक्री चालू होती. या ठिकाणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून संबंधिताना कह्यात घेतले असून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

याविषयी बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार चिमणगाव येथे अचानकपणे जाऊन सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली.

या वेळी चिमणगाव सीमेतील सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये आणि दुकान मालकाच्या चारचाकी वाहनांमध्ये ७ लाख ८ सहस्र ५७६ रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आला. कोरोना काळात सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने संबंधित दुकानदारावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.