फोंडा, २ मे (वार्ता.) – गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे हत्या करण्यासाठी नेणार्या २ बैलांना जीवदान मिळाले. या प्रकरणी बोरी, फोंडा येथून अनधिकृतपणे गुरांची वाहतूक करणारा दत्तगड, बेतोडा येथील युवक संतोष पथरूट याला फोंडा पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
२८ एप्रिलच्या रात्री उशिरा गोरक्षकांना एका मिनी टेंपोमधून बोरीहून निरंकालच्या दिशेने २ बैलांची अनधिकृतरित्या वाहतूक केले जात असल्याची माहिती मिळाली. गोसेवकांनी टेंपोचालकाकडे कागदपत्रांची माहिती मागितली असता त्याच्याकडे कोणतीच माहिती नव्हती. या प्रकरणी गोसेवकांनी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहन कह्यात घेतले. तसेच कह्यात घेतलेले बैल ‘गोरक्षा फाऊंडेशन’ यांना सुपुर्द करण्यात आले आहेत.
संशयिताच्या विरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. या प्रकरणात बेतोडा पंचायतीचा एक पंचसदस्य गुंतल्याची शक्यता आहे. दत्तगड भागात अनधिकृतपणे पशूवधगृह कार्यरत असल्याचा संशय असून या दृष्टीने अन्वेषण केले जाण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणार्या गोवंशाला टेंपोत कोंबून गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देत हत्येसाठी नेले जात असल्याचा संशय गोरक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. फोंडा परिसरात अचानकपणे गोवंश अल्प होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा संशय व्यक्त केला जात आहे. या गोवंशाच्या तस्करीमागे एखादी टोळी सक्रीय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.