कर्नाटकच्या मंत्र्याकडून धान्य पुरवठ्याच्या विलंबाविषयी प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यास ‘जाऊन मरा’ असे उद्दाम उत्तर !

असे उद्दाम उत्तर देणे, ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. कर्नाटकमधील सत्ताधारी भाजप सरकारने अशांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !

मंत्री उमेश कट्टी

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांना एका शेतकऱ्याने ‘सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे होणाऱ्या विनामूल्य धान्य पुरवठ्यास विलंब होत असल्याने तोपर्यंत आम्ही जिवंत कसे रहावे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्र्यांनी  ‘जाऊन मरा’ असे उत्तर दिले. त्यानंतर मंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरणही तशाच प्रकारे उद्धटपणाचे होते.

१. उत्तर कन्नडा जिल्ह्यातील एका शेतकर्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे होणाऱ्या विनामूल्य धान्य पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही, अशी तक्रार उमेश कट्टी यांना समक्ष भेटून केली. त्यावर प्रत्येक कुटुंबाला ५ किलो धान्य पुरवण्यात येत असल्याचा आदेश शासनाने दिला असल्याचे त्यांनी शेतकऱ्याला सांगितले; मात्र ‘या आदेशाची कार्यवाही होण्यास विलंब होत आहे’, असे शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून देऊन ‘धान्य पुरवठा होईपर्यंत आम्ही जिवंत कसे रहावे ?’, असा प्रश्न विचारला. त्यावर मंत्र्यांनी  ‘जाऊन मरा’ असे उत्तर दिले.

२. उमेश कट्टी यांच्या या उत्तरावर समाजातून मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यावर त्यांनी स्पष्टीकरण देऊन स्वतःच्या कृतीचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्याने प्रश्न विचारतांना टोचून विचारला होता; म्हणून मीही त्याला त्याच भाषेत उत्तर दिले.’’ (लोकशाहीत मंत्री हे जनतेचे सेवक असतात. त्यामुळे त्यांनी शांतपणे आणि नम्रतापूर्वक असे प्रसंग हाताळणे अपेक्षित आहे ! – संपादक) यावर एका पत्रकाराने कट्टी यांना, ‘तुम्ही त्याला सांगायला हवे होते की, राज्यशासन पूर्ण साहाय्य्य करत आहे. आपण मरणाचा विचार सोडून द्या.’ मात्र कट्टी त्यांच्या शब्दांवर ठाम राहिले.