मिरज, २८ एप्रिल – राज्यात दळणवळण बंदी घोषित झाल्यापासून केस कापणारे, सुतार, कुंभार, शिंपी, परीट अशा १२ बलुतेदारांमधील छोट्या घटकांमधील व्यवसाय पूर्णत: बंद आहेत. अगोदरच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज दळणवळण बंदीमुळे अधिकच अडचणीत आला आहे. यामुळे या सामाजावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी १२ बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ बलुतेदारांमधील परंपरागत व्यावसायिकांना प्रतिकुटुंब किमान ५ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य करावे. याच समवेत तालुकास्तरावर कोरोना रुग्णालय चालू करावे आणि त्यांच्यावर चांगले उपचार होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत. या वेळी भारतीय जनता ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. जयगोंड कोरे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. शिवरुद्र कुंभार, सांगली जिल्हा शहर सचिव श्री. सचिन हारगे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.