गोव्यात आज सायंकाळपासून ४ दिवसांसाठी दळणवळण बंदी

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २८ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाने २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून ३ मे या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत दळणवळण बंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २८ एप्रिल या दिवशी दुपारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्यात प्रतिदिन २ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेली महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. २९ एप्रिलला सायंकाळी ७ वाजल्यापासून ३ मे सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात कडक दळणवळण बंदी असेल.

२. सरकारी अत्यावश्यक सेवा चालू रहातील, तसेच जीवनावश्यक सेवेच्या अंतर्गत येणारी किराणा दुकाने चालूच रहाणार आहेत. त्यांना वेळेचे बंधन नाही.

३. सार्वजनिक वाहतूक, कॅसिनो, आठवड्याचे बाजार पूर्णपणे बंद रहातील.

४. राज्यांच्या सीमा येण्या-जाण्यासाठी खुल्या रहातील.

५. मद्यालये आणि रेस्टॉरंट बंद रहातील. अन्नपदार्थ घरपोच पोचवण्यास त्यांना मुभा असेल. ग्राहकही उपाहारगृहातून त्यांचे अन्नपदार्थ घेऊन जाऊ शकतात.

६. औद्योगिक आस्थापने चालू रहाणार असून त्याअंतर्गत होणारी वाहतूक चालू असेल. औद्योगिक आस्थापनांनी स्वतः वाहतुकीची व्यवस्था करावी.

७. काही भाग ‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ घोषित करण्यात येतील.

८. विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत पार पडू शकतात.

९. धार्मिक कार्यक्रम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून चालू राहू शकतात.

१०. जीवनावश्यक सेवेअंतर्गत सर्व दुकाने चालू रहाणार असल्याने नागरिकांनी गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही.

११. दळणवळण बंदी ३ मेला सकाळी उठवली जाईल आणि त्यानंतर सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत चालू होतील. यामुळे राज्यातील कामगारवर्गाने घाबरून जाऊ नये.

१२. दळणवळण बंदीशी संबंधित अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

१३. दळणवळण बंदीच्या काळात कोरोना लसीकरण केंद्रे चालूच रहाणार आहेत आणि पूर्वनोंदणी केलेल्यांना कोरोनाची लस घेता येणार आहे.