विशाळगडावरील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांच्या दुरवस्थेचे प्रकरण
कोल्हापूर, २७ एप्रिल (वार्ता.) – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने मार्चमध्ये विशाळगडावरील अतिक्रमण, मंदिरे-समाध्या यांची दुरवस्था या संदर्भात आंदोलन चालू करण्यात आले आहे. हे आंदोलन सामाजिक माध्यमांद्वारे जागतिक पातळीवर पोचले आहे. विशाळगड मोहिमेच्या निमित्ताने केलेले एक ट्वीट पाहून अमेरिका येथील एका युवा हिंदु धर्माभिमान्याने समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांना संपर्क करून संपूर्ण मोहीम समजून घेतली आणि त्या संदर्भात थेट तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली. हा १७ वर्षीय धर्माभिमानी विद्यार्थी मूळचा आंध्रप्रदेश येथील असून त्याने पुढच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करून या विषयाच्या संदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. (परदेशातील एका युवा धर्माभिमान्यास भारतातील महाराष्ट्र राज्यातील एका गडाविषयी श्रद्धा वाटते आणि याचे दायित्व ज्यांच्यावर आहे ते पुरातत्व खाते हातावर हात धरून बसण्यापलीकडे काहीच करत नाही, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)
धर्माभिमान्याने केलेल्या तक्रारीतील सूत्रे
१. विशाळगड येथील किल्ला अत्यंत वाईट स्थितीत असून त्यावर पुष्कळ अधिक प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. यावर तातडीने उपाययोजना काढणे आवश्यक आहे. विशाळगडाची भग्नावस्था आणि त्यावर झालेले अतिक्रमण याविषयी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने पुष्कळ महत्त्वाची सूत्रे मांडली आहेत.
२. किल्ला आणि त्यावरील मंदिरे यांची दुरव्यस्था : वाघजाईदेवी ही विशाळगड येथील ग्रामस्थांची ग्रामदेवी आहे; मात्र तिचे मंदिर अत्यंत दारुण अवस्थेत आहे. मंदिराची अर्धी भिंत आणि एक कोरीव खांब वगळता ते संपूर्णपणे ध्वस्त झालेले आहे आणि वाघावर बसलेल्या वाघजाईदेवीची मूर्ती भग्न अवस्थेत आहे. या परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिर, नृसिंह मंदिर, श्री विठलाईदेवी मंदिर, श्रीराम मंदिराची पडझड झालेली आहे. किल्ल्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
३. बाजीप्रभू देशपांडे यांची दुर्लक्षित समाधी : स्वराज्यासाठी प्राण देणार्या वीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे पुरातत्व विभागाने संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या समाधीस्थळाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. या स्थळावर समाधीविषयी माहिती देणारा साधा फलकही लावण्यात आलेला नाही.
४. अतिक्रमण : गेल्या २० वर्षांच्या काळात किल्ल्यावर पुष्कळ अतिक्रमण झाले आहे. एका माहिती अधिकाराच्या याचिकेला उत्तर देतांना पुरातत्व विभागाने ‘किल्ल्यावर अनधिकृत बांधकामांच्या स्वरूपात पुष्कळ अतिक्रमण झालेले आहे’, असे मान्य केले आहे. या किल्ल्यावर शासनाच्या इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत बेघरांना घरे बांधून देण्यात आली आहेत. या घरांसाठी केवळ २८८ स्क्केअर फूट भूमीची मान्यता असूनही प्रत्यक्षात १२०० ते १३०० स्क्केअर फूट क्षेत्रफळाची घरे बांधण्यात आली आहेत.
वरील सूत्रांचा गांभीर्याने विचार करून पुरातत्व आणि संग्रहालय संचलनालयाने किल्यावरील मंदिर आणि समाधी स्थळ यांचे पुर्ननिर्माण आणि परिसरातील अवैध अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात अत्यंत तातडीने कृती करावी.