परमबीर सिंह हे पोलिसांच्या स्थानांतरासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये घ्यायचे !

अकोला येथील पोलीस निरीक्षक बी.आर्. घाडगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे खळबळजनक माहिती

  • भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंंत्रणा !
  • परमबीर सिंह यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी
  • आजपर्यंत भ्रष्टाचार करणार्‍या दोषी पोलीस अधिकार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा न झाल्याने पोलीस दलात प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे. या प्रकरणी सरकारने सत्य जनतेसमोर आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
परमबीर सिंह

अकोला – मुंबई येथील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे पोलिसांच्या स्थानांतरासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये घेत होते, असा खळबळजनक आरोप करून परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी येथील पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बी.आर्. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पाठवलेल्या पत्रांत केली आहे.

परमबीर सिंह १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ अशी सलग ३ वर्षे ठाणे शहराचे पोलीस आयुक्त होते. त्या काळात घाडगे हेही तेथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याने त्यांनी पाठवलेल्या पत्रांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

बी.आर्. घाडगे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,

१. परमबीर सिंह यांनी पद आणि अधिकार यांचा अपवापर करून भ्रष्टाचार केला आहे. २ पोलीस हवालदार गेल्या २० वर्षांपासून त्यांच्यासमवेत त्यांचे खासगी व्यवहार पहाण्यासाठी आणि स्थानांतरांमधील भ्रष्टाचाराच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी आहेत. परमबीर यांनी बेनामी संपत्ती कुठे आणि कुणाच्या नावावर खरेदी केली आहे, याविषयी मला संपूर्ण माहिती आहे.

२. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसर्‍याच्या नावावर २१ एकर भूमी खरेदी केलेली आहे. त्यांच्या एका मित्राद्वारे १० ते १५ लाख रुपये घेऊन ‘रिव्हॉल्व्हर लायसन्स’ दिले जात होते. त्यांच्याद्वारे वास्तूविशारदची कामे कोट्यवधी रुपयांची तडजोड करून दिली जात होती. जो अधिकारी त्यांचे ऐकत नव्हता, त्याचे नियंत्रण कक्षात स्थानांतर करण्यात येत होते.

३. परमबीर सिंंह यांनी माझ्याविरुद्धही ५ खोटे गुन्हे नोंदवले होते. स्थानांतरांचे पैसे जमा करण्यासाठी राजू अय्यर नावाचा दलाल ठेवला होता. पोलीस निरीक्षकांच्या स्थानांतरांसाठी ५० लाख ते १ कोटी रुपये घेतले जात होते.

४. दिवाळी भेट म्हणून त्यांनी पोलीस उपायुक्त (डीसीपी) यांच्याकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याची बिस्किटे, साहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून २० ते ३० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे आणि पोलीस निरीक्षकाकडून ३० ते ४० तोळे सोन्याची बिस्किटे घेतली आहेत. भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे त्यांनी वास्तूविशारद बोमन इराणी आणि रुतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत.

५. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात प्रतिदिन अनुमाने २५० ते ३०० डंपरवजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये प्रतिदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. अवैध वाळू व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केल्यास त्या पोलीस अधिकार्‍याविरुद्ध खोटे गुन्हे नोंद करून त्यास अडकवले जात होते. त्यामध्ये मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. याविषयी मी १७ मार्च २०१६ या दिवशी तक्रार दिलेली आहे.

६. परमबीर यांनी त्यांचा मुलगा रोहन याच्या नावाने सिंगापूर येथे व्यवसाय चालू केला असून त्यामध्ये २ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अ‍ॅन्टेलिया रस्त्यावर त्यांनी ६३ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. परमबीर यांची पत्नी सविता यांच्या नावाने ‘खेतान अ‍ॅण्ड कंपनी’ उघडली असून तिचे कार्यालय इंडिया बूल इमारत, ६ वा मजला, लोअर परेल, मुंबई येथे आहे. त्या आस्थापनाच्या संचालक आहेत. या आस्थापनात ५ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. माझ्याकडे असलेल्या अन्वेषणातील गुन्ह्यातील आरोपींची नावे काढून टाकण्याचे आदेश परमबीर यांनी दिले होते. ते न ऐकल्याने माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे नोंद केले. या प्रकरणातील आरोपींची नावे काढून टाकण्यात आली. त्याबदल्यात त्यांनी २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

७. सलील चतुर्वेदी यांना अमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याच्या प्रकरणात परमबीर सिंह आणि केंजळे यांचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले असतांनाही केवळ पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले; मात्र परमबीर सिंह हे आय.पी.एस्. दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांना वाचवण्यात आले.

वर्ष २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा परमबीर यांच्यासारख्या गुन्हेगारास शिक्षा करण्याऐवजी ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, असा उल्लेख घाडगे यांनी पत्रात केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी २१ सप्टेंबर २०१५ आणि मार्च २०१६ या दिवशी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध घाडगे यांनी तक्रारी केल्या आहेत.