‘शाब्बास मुंबईकर’ म्हणण्याची वेळ लवकरच येईल ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

  • प्रतिदिन ११ सहस्रांहून अधिक सापडणार्‍या कोरोनाबाधितांची संख्या आता ५ सहस्र !

  •  मुंबईत कोरोनाची साखळी तुटण्यास प्रारंभ !

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर

मुंबई – कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबलेला नसला, तरी संख्या वाढू नये, यासाठी मुंबईकर कटिबद्ध असल्याचे दिसत आहे. बहुतांश मुंबईकर घरात बसून आहेत. हे चित्र कायम राहिल्यास ‘शाब्बास मुंबईकर’, असे म्हणण्याची वेळ लवकरच येईल’, असा विश्‍वास मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील विधान केले.

या वेळी सौ. पेडणेकर म्हणाल्या,

१. ४ एप्रिल या दिवशी मुंबईत ११ सहस्र १६३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. २५ एप्रिल या दिवशी ५ सहस्र ५४२ इतके कोरोनाबाधित रुग्ण सापडले. मुंबईकर कोरोनाविषयक नियमांचे पालन करत आहेत. संयम दाखवत आहेत, याचा हा परिणाम आहे.

२. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटण्यास प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने राज्यातील यंत्रणांशी बोलत आणि केंद्रशासनाशी समन्वय साधून काम करत आहेत. आवश्यक त्या सूचना देत आहेत.

३. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग अल्प झाला आहे. तो शून्यावर यायला हवा. मागील वर्षी धारावीकरांनी कोरोनावर मात केली, तेव्हा जगभरातून कौतुक झाले. तसेच कौतुक मुंबईकरांच्या वाट्याला येईल. केवळ यापुढेही मुंबईकरांनी नियमाला धरून रहायला हवे.

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ

मुंबई, २६ एप्रिल (वार्ता.) – संपूर्ण महाराष्ट्राचे कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ (संवेदनशील क्षेत्र) होत असलेल्या मुंबईमधील कोरोनाच्या संसर्गाचा वेग मंदावत आहे. मागील आठवडाभरात मुंबईत कोरोनावाढीचा वेग २ टक्क्यांनी न्यून झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मागील आठवडाभरात २ टक्क्यांनी वाढले आहे. मागील काही दिवस मुंबईमध्ये नियमित कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची सरासरी संख्या ९ सहस्रांहून अधिक होती. मागील आठवडाभरात ही संख्या अल्प होत आहे. २५ एप्रिल या दिवशी मुंबईत ५ सहस्र ५४२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. मागील आठवडाभरात मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची सरासरी संख्या ६२ इतकी आहे. असे असले, तरी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र न्यून झालेले नाही.