विश्व हिंदु परिषदेच्या कोकण प्रांतात महारक्तदान शिबिरांचे आयोजन
पनवेल, २५ एप्रिल (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे, तसेच येत्या काही दिवसांत १८ वर्षे वयोगटातील युवकांनाही कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याने किमान ६० दिवस तरी युवकांना रक्तदान करता येणार नाही, तरी भविष्यात रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी नावडे येथील प.जो. म्हात्रे विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ४२ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. हरेश केणी, श्री. संतोष भोईर, बजरंग दलाचे सहसंयोजक श्री. संजय उलवेकर, विश्व हिंदु परिषद पनवेल प्रखंडाचे सहमंत्री श्री. संतोष मोकल, श्री. विशाल खानावकर, श्री. देवानंद म्हात्रे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विश्व हिंदु परिषद पनवेल प्रखंड प्रमुख श्री. गुरुनाथ शामा मुंबईकर यांनी केले.
या शिबिराला आमदार श्री. बाळाराम पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन, सर्व रक्तदात्यांचे आणि शिबीर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार मानले.