संभाजीनगर – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी आणि अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत; मात्र या आदेशाला न जुमानता बहुतांश इंग्रजी शाळांनी सर्रासपणे परीक्षा घेण्यास प्रारंभ केला. शासनाच्या या निर्णयाचे शिक्षक आणि पालक यांच्याकडून स्वागत करण्यात आले होते; मात्र खासगी इंग्रजी शाळांनी या निर्णयाला विरोध दर्शवला.
खासगी शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत ‘ऑनलाईन’ परीक्षा, तसेच तत्सम उपक्रम घेणे चालू केले होते. ही गोष्ट निदर्शनास आल्यावर नियमांचे उल्लंघन करणार्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे कोरोना परिस्थितीतही काही शाळांनी विद्यार्थ्यांना विविध ‘असाईनमेंट’ दिल्या होत्या. याविषयी पालकांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ‘शासनाने वरील आदेश दिला आहे’, असेही जयस्वाल यांनी म्हटले आहे.