कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारासाठी निधीची कमतरता असल्याने मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयातील शवागार भरले

जिल्हाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपानंतर २ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

मडगाव – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भिकार्‍यांवर अंत्यसंस्कार करण्यास निधीची अडचण निर्माण झाल्याचे २० एप्रिलला वृत्त होते. यामुळे हे बेवारस मृतदेह हॉस्पिसियो रुग्णालयाच्या शवागारात ठेवणे भाग पडले होते. मागील ४ दिवसांत कोरोनामुळे निधन झालेल्या ४ मृतदेहांसह एकूण ११ मृतदेह शवागारात पडून होते. शवागार मृतदेहांनी भरल्याच्या घटनेची दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटयाल (आय.ए.एस.) यांनी २० एप्रिल या दिवशी गंभीरपणे नोंद घेतली. जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांच्या हस्तक्षेपामुळे मडगाव नगरपालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. मडगाव नगरपालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या उर्वरित २ मृतदेहांची, तसेच अन्य ११ मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठरवले आहे. निधीच्या कमतरतेचा प्रश्‍न त्वरित सोडवण्याचेही जिल्हा प्रशासनाने ठरवल्याचे समजते.

गतवर्षी कोरोनामुळे मृत्यू आलेल्या भिकार्‍यांवर मडगाव नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले होते आणि यासाठी लागणारा निधी जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवला जाणार होता; मात्र प्रत्यक्षात गेल्या वर्षीचा निधी पालिकेपर्यंत अजूनही पोचला नाही. गेल्या वर्षीचा निधी न मिळाल्याने पालिका अत्यंसंस्कारासाठी पुढाकार घेत नव्हती. त्यात भर म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयातून भिकार्‍यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी निधी देऊ नये, असा आदेश निघाल्याने या समस्येत आणखीनच भर पडली होती. एरवी मृत भिकारी किंवा बेवारशी व्यक्ती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका पुढाकार घेत असते. त्याचे दायित्व मडगाव पालिकेतील एका अधिकार्‍यावर आहे; मात्र सध्या हा अधिकारी नगरपालिका निवडणुकीत व्यस्त आहे. हे दायित्व अन्य कुणाकडेही सोपवलेले नाही किंवा दुसरा अधिकारी त्यासाठी पुढाकार घेत नाही. यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले नव्हते.