|
मुंबई – २० एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्यासाठी मंत्रीमंडळाचे एकमत झाले आहे. बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांनी राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कडक दळणवळण बंदीला अनुमती दर्शवली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २१ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून दळणवळण बंदीची घोषणा स्वत: मुख्यमंत्री करतील, अशी माहिती प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. दळणवळण बंदी १५ दिवसांची असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १० वीची परीक्षा रहित करण्याचा आणि १२ वीची परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेपर्यंत पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ऑक्सिजनची मागणी आणि उत्पादन, ‘रेमडेसिविर’ औषधाचा पुरवठा या महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ‘रेमडेसिविर’ औषधाच्या पुरवठ्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘रेमडेसिविर’च्या उत्पादक आस्थापनांसमवेत बैठक घेतली.