समाज पैशासाठी कोणत्या स्तराला जात आहे, याचे उदाहरण ! रेमडेसिविर इंजेक्शनची अवैध विक्री करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !
संभाजीनगर – शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची घटना २ दिवसांपूर्वी उघडकीस आलेली असतांना या इंजेक्शनसाठी अधिकचे पैसे देण्यास नकार देणारे ग्राहक प्रवीण रामदास मोटे यांना औषध दुकान चालक आणि इतरांनी मारहाण केली. ही घटना १८ एप्रिलच्या रात्री सिडको एन्. ९ भागातील अहिंसा चौक येथे घडली. या प्रकरणी मोटे यांच्या तक्रारीवरून अर्बन मेडिकलचा चालक आणि इतरांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रवीण मोटे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कोरोनामुळे आजारी असलेले माझे नातेवाईक हायटेक आधार रुग्णालयात ३ दिवसांपासून उपचार घेत आहेत. त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागतील, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्यामुळे १८ एप्रिल या दिवशी मी अहिंसा चौक, रायगडनगर येथे असलेल्या अर्बन मेडिकल चालकाकडे इंजेक्शनविषयी विचारणा केली. त्यांनी होकार दर्शवल्याने रात्री ९.३० वाजता या दुकानात आलो; मात्र दुकानदाराने तेव्हा इंजेक्शन नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही मेडिकलच्या बाजूला विचार करत उभा राहिलो.
थोड्याच वेळात एक अनोळखी व्यक्ती तेथे आली आणि तिने अधिकचे पैसे देत असाल, तर रेमडेसिविर मिळवून देतो, असे सांगितले. आम्ही ‘अधिक रक्कम देणार नाही, मूळ किमतीतच द्या’, असे त्या व्यक्तीला सांगितले. याच कारणावरून मेडिकल चालक आणि त्यांच्यासमवेत असलेल्या धम्मा खेत्रे, सतीश नवगिरे यांनी माझ्याशी हुज्जत घालून मारहाण केली. या वेळी रात्र गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी वाद मिटवला आणि मोटे यांना पोलीस ठाण्यात नेले.