खोटी माहिती पसरवल्याविषयी नवाब मलिक यांच्यावर गुन्हा नोंद करा ! – सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप

नागपूर – कोरोनाच्या संकटावर केंद्र सरकारची अपर्कीती करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक करत आहेत. खोटे आरोप करून जनतेच्या मनात भीती पसरवण्याचा आणि गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५४ अन्वये राज्य सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी १८ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत केली.

ते पुढे म्हणाले की, देशभरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. कौशल्य विकास विभागाचे दायित्व पहाणारे नवाब मलिक आपले कौशल्य केंद्र सरकारची अपर्कीती करण्यासाठी उपयोगात आणत आहेत. महाराष्ट्राला रेमडेसिविरचा पुरवठा होऊ नये यासाठी केंद्र सरकार आस्थापनांवर दबाव आणत असल्याचा खोटा आरोप मलिक यांनी १७ एप्रिल या दिवशी केला होता. मंत्रीपदावर असून जनतेमध्ये खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे राज्य

सरकारने तातडीने त्यांच्यावर तक्रार प्रविष्ट केली पाहिजे.

या गुन्ह्यात १ वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. या संदर्भात राज्य सरकारने हालचाल न केल्यास राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करण्याची विनंती करू. महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शनसाठा उपलब्ध व्हावा, यासाठीच भाजपच्या वतीने ‘ब्रुक फार्मा आस्थापना’शी संपर्क साधण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परवाना मिळवून दिला आहे; मात्र आस्थापनाच्या मालकाला भीती दाखवून खंडणीखोर सरकारने नवा राजकीय आतंकवाद निर्माण केला आहे. राज्याला आतापर्यंत १ कोटी २९ लाख डोस उपलब्ध झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १७ लाख लस शिल्लक आहेत, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.