ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी !

खाजगी रुग्णालयांची आक्रमक भूमिका !

नगर – रेमडेसिविर इंजेक्शन पाठोपाठ आता ऑक्सिजनचाही प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सगळी रुग्णालये अडचणीत आली आहेत. यामुळे ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी चालू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून समान वाटप केले नाही, तर खाजगी कोविड रुग्णालये बंद करू, अशी चेतावणी खासगी रुग्णालयांनी दिली आहे. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस बंदोबस्तात सरकारी रुग्णालयात नेण्यात आलेल्या टँकरमधील अर्धा ऑक्सिजन खासगी रुग्णालयांना देण्यात आला. नगर जिल्ह्याला प्रतिदिन ५० टन ऑक्सिजनची गरज लागते; मात्र पुरवठा केवळ ३० ते ३५ प्रतिशत होत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पोर्टल तयार करून त्यावर ऑक्सिजनची मागणी, पुरवठा, उपचार घेत असलेले रुग्ण इत्यादींची नोंद केली तर असे अपप्रकार होणार नाहीत. राज्यस्तरावरून नियोजन करून कोविड रुग्णालयांना प्राधान्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा आदेश द्यावा, अशा मागण्या खासगी कोविड रुग्णालयांनी केल्या आहेत.