सांगली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत १०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

सांगली, १६ एप्रिल – गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत १०६ जणांचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला आहे, तर ७ सहस्र ८१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना आचारसंहितेकडे सामान्य नागरिकही दुर्लक्ष करत असून संचारबंदीच्या काळातही विविध कारणे काढून बाहेर फिरणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. नागरिकच ऐकत नसल्याने प्रशासनही काहीसे हतबल झाले आहे.

सध्या जिल्ह्यात ५ सहस्र ५२८ रुग्णांवर उपचार चालू असून त्यापैकी ७३७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात काही दिवसांपूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या ४ दिवसांपासून प्रतिदिन १९० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. केंद्रशासनाने निर्देश दिल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली असून प्रतिदिन सरासरी ४ सहस्र चाचण्या करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा वेग या आठवड्यात १३.३८ टक्के आहे, तर मृत्यूदर १.०४ टक्के आहे. नागरिकांनी जर स्वयंशिस्तीचे पालन केले नाही, तर जिल्ह्यात गतवेळपेक्षाही गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.