पाकमध्ये सामाजिक माध्यमांवर तात्पुरती बंदी

पाकमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराचा परिणाम !

हिंसाचार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अंतर्गत हिंसाचारामुळे पाक सरकारने सामाजिक माध्यमांवर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बंदी घातली आहे. हिंसाचाराचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटर, फेसबूक, यू ट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम यांवर ही बंदी घालण्यात आली आहे. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टी.एल्.पी.) या संघटनेचा अध्यक्ष साद रिझवी याला अटक केल्यानंतर हा हिंसाचार चालू झाला आहे. टीएल्पी गेल्या काही मासांपासून फ्रान्सच्या राजदूताला पाकिस्तानातून बाहेर काढण्याची मागणी करत निदर्शने करत आहे. हिंसाचार पसरवल्यामुळे आतंकवाद कायद्याच्या अंतर्गत टीएल्पीवर बंदी घालण्यात आली आहे.

पाकच्या लाहोर, इस्लामाबाद आणि अन्य शहरांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. गेल्या ३ दिवसांत झालेल्या हिंसाचारात २ पोलीस अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांनी प्राण गमावल्याचे सांगण्यात येत आहे.